वर्धा : पिसाळलेल्या मोकाट श्वानांनी गावात चांगलाच उच्छाद घातला असून, मोकाट श्वानांनी सात जणांचे लचके तोडून जखमी केले. विशेष म्हणजे जखमींमध्ये पाच बालकांचाही समावेश आहे. ही घटना रेहकी गावात शुक्रवारी घडली. या घटनेमुळे रेहकी गावातील नागरिक भयभीत झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, एक चिमुकली दुपारच्या सुमारास घरासमोरील अंगणात खेळत असताना एका श्वानाने अचानक तिच्यावर हल्ला केला. हल्ल्यात तिच्या चेहऱ्याला तसेच हाताला जखमा झाल्या. त्यानंतर त्या श्वानाने रस्त्यावरून जाणाऱ्या अंशू सुरेश मानके (७) याच्या हाताला चावा घेत लचका तोडला. तसेच अनुष्का दामोधर धाबर्डे (१०) हिच्या उजव्या हाताच्या दंडाला चावा घेत जखमी केले.
या घटनेमुळे गावातील नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे. दरम्यान, पिसाळलेल्या श्वानाने रोशन दिलीप सराटकर (१०) यालादेखील चावा घेत जखमी केले. याच धडपडीत सिकंदर गोडघाटे नामक तरुणाच्या पायावरदेखील श्वानाने चावा घेतला. अखेर गावातील नागरिकांनी पिसाळलेल्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घेत त्या पिसाळलेल्या श्वानाला यमसदनी पाठविले.
पुन्हा एका बालकावर केला हल्ला
शुक्रवारची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या पिसाळलेल्या श्वानाने एका बालकावर हल्ला चढवला. मात्र, नागरिकांनी आरडाओरड केली असता झालेल्या झटापटीत तो बालक रस्त्यावर पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. सर्व जखमींना सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना सुटी देण्यात आली.
गावकऱ्यांत दहशत, बंदोबस्ताची मागणी
मागील काही दिवसांपासून गावात पिसाळलेल्या मोकाट श्वानांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अशातच बालकांवर अचानक होणारे हल्ले गंभीर बाब आहे. त्यामुळे या पिसाळलेल्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता नागरिकांतून केली जात आहे.