आंदोलनाचा पंधरवडा : कंपनी प्रशासनाकडून अद्याप दखल नाहीहिंगणघाट : येथील सुगुना फुड्सच्या कामगारांनी किमान वेतनाकरिता कंपनीसमोर उपोषण सुरू केले. जिल्ह्यात पारा ४५ अंशावर असताना १५ दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाची कंपनी प्रशासनाकडून द्याप कुठलीही दखल घेतली नाही. या उपोषणाची माहिती नागपूरच्या असिस्टंट लेबर कमिशनर बनकर यांना मिळाली असता त्यांनी उपोषण मंडपाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कामगारांसोबत चर्चा झाली; मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. येथील एकता कामगार युनियनद्वारे गत १४ दिवसापासून उपोषण सुरूच आहे. या उपोषण मंडपात आतापर्यंत ११ जणांनी उपोषण केले आहे. ९ एप्रिल पासून सुरू झालेल्या उपोषणात आतापर्यंत दामोदर वंजारी, चेतन पिसे, नंदू काळे, भगवान बारई, नितीन गायकवाड, किशोर हेडावू, युनिस शेख, कैलास मून, श्रीकांत आसोले, हरिश्चंद्र चौधरी, राहुल जावळकर हे सध्या उपोषणावर बसले आहेत. यात प्रकृती खालावल्याने दामोदर वंजारी, चेतन पिसे, नंदू काळे यांना उपोषण सोडावे लागले. उपोषणास बसलेल्यांमध्ये अशक्तपणा वाढल्याने हिंगणघाट येथील ग्रामीण रुग्णालयाद्वारे उपोषणकर्त्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर काहींनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. शनिवारी उपोषणकर्ता किशोर हेडावू हा एकटाच उपोषणावर बसून होता. कंपनीमध्ये किमान वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच पुणे, मुंबई, बिहार येथे बदली करण्याच्या धमक्या कामगारांनाा दिल्या जात असल्याचे आंदोलक सांगत आहेत. अद्यापही कंपनीद्वारे दखल घेण्यात आलेली नाही.(शहर प्रतिनिधी) उपोषण करणाऱ्या कामगारांच्या मागण्याज्या सात कामगारांना संघटनात्मक भेदभाव व पूर्ण बदली देऊन कामावरून बेदखल केले त्यांना त्वरित कामावर घेण्यात यावे. कंपनीतील ठेकेदार पद्धती त्वरित बंद करण्यात यावी. कामगारांना नियमानुसार किमान वेतन देण्यात यावे. कंपनीमध्ये कामगारांकडून १२ तास काम करून घेतल्या जाते ते त्वरित बंद करण्यात यावे. कंपनीतील सर्व कामगारांना स्थायी करण्यात यावे, तसेच त्यांना ओळखपत्र देण्यात यावे. कंपनीतील काम करणाऱ्या सर्व कामगारांचा पी.एफ. कापण्यात यावा आणि आज पर्यंतचा पी.एफ. एरिअर्स म्हणून जमा करावा. अधिक वेळ काम केल्यास नियमानुसार अधिक भत्ता द्यावा. कंपनीत काम करणाऱ्या सर्व कामगारांना आरोग्य सेवा ईसीआयसी नियमानुसार उपलब्ध करून द्यावी. कामगारांना काम नाही म्हणून कामावरून परत पाठविणे त्वरित बंद करण्यात यावे. कंपनीत उच्च पदावर व एच.आर.स्थानिक भाषिक लोक असावे. कंपनीत कामगारांना बोनस नियुक्ती नुसार देण्यात यावे व मागील बोनस एरिअर्स देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
तळपत्या उन्हातही कामगारांचे उपोषण सुरूच
By admin | Updated: April 24, 2016 02:17 IST