खोलीत डांबल्याची तक्रार : महिला व बालकल्याण विभागाचे दुर्लक्षवर्धा : निराश्रीत महिलांना थारा देण्यासाठी उज्ज्वल गोंडवाणा महिला मंडळ नागपूरद्वारे येथे महिला स्वाधार गृह थाटण्यात आले. या केंद्रात केवळ पाच महिला असताना ५० महिलांच्या नावे शासन अनुदान लाटले जात आहे. शिवाय महिलांची उपासमार होत आहे. शनिवारी महिलांनी सेवाग्राम पोलीस व महिला बालकल्याणकडे तक्रार केल्याने ही बाब उघड झाली. महिला स्वाधार गृहामध्ये निराश्रीत महिलांना थारा दिला जातो. निराश्रीत महिलांना सहा महिने या केंद्राद्वारे विविध प्रकारचे प्रशिक्षण देणे अपेक्षित असते; पण महिला स्वाधार गृहात कुठलेही प्रशिक्षण दिले जात नसल्याचा आरोप तेथील महिलांनी केला. शिवाय काळजी वाहक महिला या निराश्रीत महिलांना शिवीगाळ करतात, व्यवस्थित जेवण दिले जात नाही, असा आरोपही तेथील महिलांनी लेखी तक्ररीतून केला आहे. गत तीन दिवसांपासून स्वाधार गृहातील चार महिलांना जेवण देण्यात आले नाही. यामुळे त्यांची उपासमार झाली. शिवाय शुक्रवारपासून त्यांना एका खोलीत कोंबून ठेवल्याचा आरोपही महिलांनी केला. शुक्रवारी या महिलांनी पोलीस मदत क्रमांकावर कॉल करून स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर चारही महिला शुक्रवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत सेवाग्राम पोलीस ठाण्यात होत्या; पण त्यांना घेण्याकरिता कुणीही आले नसल्याचेही तक्रारी नमूद आहे. या स्वाधार गृहात निराश्रीत महिलांची काळजी घेतली जावी म्हणून शासनाकडून ५०० रुपये प्रती महिला प्रती महिना अनुदान दिले जाते; पण येथे ५० महिलांच्या नावे अनुदानाची उचल केली जात असल्याचा आरोपही महिलांनी केला. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी स्वाधार गृहातील निराश्रीत महिलांनी तक्रारीतून केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
स्वाधार गृहात महिलांची उपासमार
By admin | Updated: June 21, 2015 02:30 IST