वर्धा : पुलगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विरूळ (आ़) येथे बेड्यावरून मोठ्या प्रमाणात दारू आणली जाते़ यामुळे दारूचा महापूर आला आहे़ असाच प्रकार देवळी तालुक्यातील मुरदगाव (बे़) येथेही सुरू आहे़ याविरूद्ध दोन्ही गावांतील दारूबंदी महिला मंडळाने एल्गार पुकारला आहे़ बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत महिलांनी रोष व्यक्त केला़ विरूळ (आ़) येथे देशी व गावठी दारूचा महापूर आहे़ बेड्यावरून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असल्याने लहान मुलेही व्यसनाधीन झाली आहे़ यामुळे गावातील महिला, ग्रा़पं़ सदस्य व ग्रामस्थांनी २९ आॅगस्टपासून गावात दारूबंदी व्हावी या उद्देशाने दारूविक्रेत्यांविरूद्ध कारवाईचे शस्त्र उगारले़ याबाबत पुलगाव पोलीस ठाणे व रोहणा बीट येथे लेखी माहितीही देण्यात आली़ शिवाय सहकार्याची मागणी केली; पण पोलिसांसमोर दारू जप्त केली असता कारवाई करण्यात आली नाही़ गावांत दारू विके्रत्या महिलाही सक्रीय आहे़ महिला पोलीसही दारूबंदी मंडळास सहकार्य करीत नाही़ उलट दारूविक्रेते महिला व ग्रामस्थांना अश्लील शिवीगाळ करतात़ शिवाय जीवे मारण्याची धमकी दिली जाते; पण पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोपही महिलांनी केला आहे़ मुरदगाव (बे़) येथील दूर्गा दारूबंदी महिला मंडळाने अधीक्षकांना दारूबंदीकरिता निवेदन दिले; पण अद्याप कारवाई करण्यात आली नाही़ यामुळे विरूळ व मुरदगाव येथील महिलांनी कारवाईची मागणी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
दारूविके्रत्यांविरूद्ध महिलांचा एल्गार
By admin | Updated: September 10, 2014 23:53 IST