भोसखुरी शिवारातील घटना : दगडाने ठेचल्याचा संशय आर्वी : तालुक्यातील वाढोणा बिटातील झुडपी शिवारात छिन्नविछिन्न अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. महिलेल्या डोक्यावर गोट्याने मारल्याचे दिसून आल्याने तिची हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. महिलेची ओळख पटविण्याचे पोलिसांचे काम सुरू आहे. यात सायंकाळपर्यंत त्यांना यश आले नसल्याने या प्रकरणी अज्ञात आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वाढोणा बिटातील भोसखुरी येथील गार्ड उदय मुळे हे जंगलात गस्तीवर असताना त्यांना येथे एका महिलेचा मृतदेह पडून असल्याचे दिसून आले. यात सदर महिलेची दगडाने ठेवून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यावरून त्यांनी प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली. येथे सदर महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याचे दिसून आले. तिची हत्या झाल्याचा पोलिसांनी अंदाज लावला आहे. शिवाय सदर महिलेवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अतिप्रसंगी करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दगडाने ठेचून तिची हत्या केली असावी, अशी चर्चा परिसरात आहे. या चर्चेला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. ठाणेदार चौधरी यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली आहे. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या गुन्ह्यात तपासाअंती अज्ञात आरोपीवर भादंविच्या कलम ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सदर महिला अज्ञात असल्याने वैद्यकीय तपासणी तीन दिवसापर्यंत करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रकरणाचा तपास एएसआय सिद्धार्थ ढेपे करीत आहे.(शहर प्रतिनिधी)
महिलेच्या मृतदेहाने खळबळ
By admin | Updated: May 6, 2017 00:28 IST