गावकऱ्यांची मागणी : धनोडी (बहाद्दरपूर) येथील प्रकरणआर्वी : पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा व गावात सुरू असलेल्या अनेक कामात अनियमितता व निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी जोपर्यंत प्रत्यक्ष येत करणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायतचे कुलूप उघडणार नाही, अशी भूमिका धनोडी (बहाद्दपूर) येथील ग्रामवासियांनी घेतली आहे. यामुळे गत चार दिवसांपासून ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. धनोडी (बहाद्दूर) येथील नागरिकांनी ५ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयला कुलूप ठोकले. याची माहिती मिळताच आर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. डी. धापके यांनी गावाला प्रत्यक्ष भेट देत गावकऱ्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु गावकऱ्यांनी त्यांचे आश्वासन धुडाकावत ते आपल्या मागणीवर ठाम आहे.उन्हाळ्याचे दिवस असताना नियमित पाणीपुरवठा होत नाही. दलित वस्ती योजनेत झालेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून नालीला बेड काँक्रीट केलेच नाही. नव्याने बनविण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीतून दलित वस्तीतील पाणी पुरवठा होऊ शकतो; परंतु तसे न करता जुन्याच पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरून नव्याने पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यास याच टाकीवरून पूर्ण धनोडी गावाला पाणी पुरवठा झाल्यास या टाकीचे पाणी कमी पडेल, असे गावकऱ्यांचे व ग्रामपंचायतीच्या काही सदस्याचे म्हणणे आहे.(शहर प्रतिनिधी)गावकऱ्यांची ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी ८ जून रोजी मुख्यकार्यपालन अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामविकास अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली. या तक्रारीत ग्रामविकास अधिकारी हे १० ते १५ दिवसात १-२ वेळा येतात. त्यामुळे गावातील लोकांचे कामे होत नाही. त्याचप्रमाणे ग्रा.पं. मध्ये असलेला अस्थाई कर्मचारी सुद्धा मुद्दाम काही भागात कमी पाणी सोडतो, असा उल्लेख करण्यात आला आहे. ही तक्रार ग्रा.पं. सदस्य कल्पना विलास ठाकरे, नलू मारोतराव वरठी, आशिष लक्ष्मीकांत टिकले यांनी केली असून यावर १०० पेक्षा जास्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सरपंचाची विरोधकांविरोधात तक्रार गुरुवारी सरपंच सुरेखा लढे यांनी गटविकास अधिकारी आर्वी यांच्याकडे तक्रार दिली. यात विरोधी गटाच्या सदस्यांनी केलेले आरोप निराधार आहे. ते खोट्या तक्रारी करतात म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी काय कार्यवाही करतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
सीईओ आल्याशिवाय ग्रा.पं.चे कुलूप उघडणार नाही
By admin | Updated: June 10, 2016 02:05 IST