वर्ध्यात भेसळयुक्त ‘नेपाळी’ खाद्यतेलाची सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 01:11 PM2021-07-21T13:11:37+5:302021-07-21T13:13:02+5:30

Wardha News वर्धा बाजारपेठेतील घाऊक तेल दुकानांतून नेपाळ येथून आलेल्या भेसळयुक्त सोयाबीन खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर सर्रास विक्री होत आहे. प्राप्त तक्रारीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने खाद्यतेलाचे नमुने घेतले.

Widespread sale of adulterated 'Nepali' edible oil in Wardha | वर्ध्यात भेसळयुक्त ‘नेपाळी’ खाद्यतेलाची सर्रास विक्री

वर्ध्यात भेसळयुक्त ‘नेपाळी’ खाद्यतेलाची सर्रास विक्री

Next
ठळक मुद्देघाऊक विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणावर साठा एफडीएने चार दुुकानांतून घेतले नमुने

 लोकमत न्यूज नेटवर्क    

वर्धा : बाजारपेठेतील घाऊक तेल दुकानांतून नेपाळ येथून आलेल्या भेसळयुक्त सोयाबीन खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर सर्रास विक्री होत आहे. प्राप्त तक्रारीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने खाद्यतेलाचे नमुने घेतले. मात्र, जप्तीची कारवाई करण्यात आली नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोयाबीनसह, शेेंगदाणा, सूर्यफूल, राइस ब्रान आदी खाद्यतेलाचे भाव मध्यंतरी गगनाला भिडले होते. सोयाबीन १६० ते १७० रुपये प्रतिकिलो, शेेंगदाणा तेल १८० ते २०० आणि सूर्यफूल तेल १६५ ते १७० रुपये किलो दराने मिळत होते. आता सोयाबीन आणि सूर्यफूल या खाद्यतेलाच्या दरात २० ते २२ रुपयांनी घसरण झाली आहे. खाद्यतेलाचे भडकलेले दर पाहता वर्ध्याच्या बाजारात भेसळयुक्त तेल विक्रीला उधाण आले आहे. घाऊक विक्रेत्यांकडून वर्ध्यातील किराणा दुकानदारांना नेपाळहून आलेल्या ‘राजहंस’ असे ब्रान्ड नेम असलेल्या तेलाची विक्री होत आहे. या तेलात पाम तेलाचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. प्रतिकिलो १५ ते २० रुपयांनी स्वस्त मिळत असल्याने सर्वसामान्य ग्राहकही खरेदीला पसंती देत आहेत. घाऊक विक्रेत्यांकडून आठवडाभरात ५०० ते ६०० टिन डब्यांचा किराणा दुकानदारांना पुरवठा केला जात आहे. वर्ध्याच्या संपूर्ण बाजारपेठेत या नेपाळहून आलेल्या तेलाचा बोलबाला आहे. मात्र, भेसळयुक्त या तेलाच्या सेवनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. एका ग्राहकाने केलेल्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने चार दुकानांतून दुकानातून या भेसळयुक्त खाद्यतेलाचे नमुने घेऊन औपचारिकता पूर्ण केली. मात्र, खाद्यतेल जप्त करीत विक्री थांबविण्यात आली नाही. त्यामुळे या विभागाच्या कार्यप्रणालीविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नमुन्याचा अहवाल येतो दोन महिन्यांनी

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न निरीक्षकांनी खाद्यतेलाचा नमुना घेत प्रयोगशाळेत पडताळणीकरिता पाठविला. मात्र, नमुन्याचा अहवाल तब्बल दोन महिन्यांनी या विभागाला प्राप्त होतो. तोपर्यंत भेसळयुक्त तेल जिल्ह्याच्या तळागाळात पोहोचणार आहे. यातूनच आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे या भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा घाऊक विक्रेत्यांकडून जप्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ग्राहकांनो, सावधान....!

वर्ध्यातील घाऊक विक्रेत्यांकडे नेपाळहून आलेल्या राजहंस असे ब्रान्ड नेम असलेल्या भेसळयुक्त तेलाचा साठा मोठ्या प्रमाणावर असून किरकोळ किराणा दुकानादारांना याचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत आहे. एक घाऊक विक्रेता आठवडाभरात ५०० ते ६०० टिन डब्यांची विक्री करीत आहे. ग्राहकांनी खाद्यतेलाची खरेदी करताना सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

महागाई भडकल्याने भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री होण्याची शक्यता आहे. विभागाकडून शहरातील बाजारपेठेतून तपासणीकरिता खाद्यतेलाचे नमुने घेण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर घाऊक, किरकोळ विक्रेत्यांकडील साठा जप्त केला जाईल.

-जयंत वाणे, सहायक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन विभाग, वर्धा.

Web Title: Widespread sale of adulterated 'Nepali' edible oil in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न