लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : छोट्या-छोट्या गोष्टींवरून लहान मुलांमध्येही राग अनावर होत असल्याचे चित्र बरेचदा दिसून येते. अनेक मुले तर रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतात. त्यामुळे मुलांना राग येत असेल तर पालकांनी त्यांना चिडवणे, रागावणे टाळावे आणि मारहाणही करू नये, तसे केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्याऐवजी त्यांच्या रागाची कारणे समजून घेऊन प्रेमाने बोलून त्यांचा राग शांत करावा, त्यांच्यासोबत वेळ घालवावा, असा सल्ला मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. रूपाली सरोदे यांनी दिला.
शिवाय काही मुलं त्यांच्या पालकांना आयुष्यभर भांडताना पाहून मोठी होतात. ही मुले हिंसा आणि आक्रमकतेला बळी पडतात. सतत नकारात्मक गोष्टी बघणे, एकटे राहणे आदी कारणांमुळे मुले रागीट होतात. मुलांना टीव्ही, मोबाइल बघण्याचा छंद असतो. बऱ्याच चित्रपटांत हिंसक दृश्ये दाखविण्यात येत असतात, त्यांचाही परिणाम मुलांवर होतो. मुले अनुकरणातून व निरीक्षणातून शिकत असतात. त्यामुळे घरातील ज्येष्ठांनी, पालकांनी आपली वागणूक कशी आहे, यावरही लक्ष केंद्रीत करणे अत्यंत आवश्यक आहे.
मुले रागीट होण्याची कारणेआई-वडील मुलांना फारसा वेळ देत नसतील तर मुले स्वतःला एकटे समजतात. त्यामुळे त्यांचा स्वभाव रागीट अन् चिडचिडा होतो.मुलांना राग आला तर त्यांची प्रेमाने समजूत घालावी. मुलांवर हात उगारणे, त्यांना चिडवणे टाळावे, मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवणे गरजेचे आहे. त्यामुळे याचेही भान पालकांनी ठेवणे गरजेचे आहे.
दहापैकी आठ केसेस रागीटआजकाल मुलांचा हट्टीपणा, रागीट स्वभाव, चिडचिडेपणा, एकाकीपणा अशा विविध कारणांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. दहापैकी आठ केसेस तर रागीट स्वभावाच्या असल्याच्या दिसून येतात. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दहापैकी आठ केसेस रागीटआजकाल मुलांचा हट्टीपणा, रागीट स्वभाव, चिडचिडेपणा, एकाकीपणा अशा विविध कारणांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. दहापैकी आठ केसेस तर रागीट स्वभावाच्या असल्याच्या दिसून येतात. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
"घरातील वातावरणाचा प्रभाव मुलांवर पडत असतो. त्यामुळे घरातील वातावरण खेळीमेळीचे असावे, आई-वडिलांनी मुलांना पुरेसा वेळ द्यावा, कधीकाळी त्याला राग आल्यास काही चुका झाल्यास त्याच्यावर न चिडता प्रेमाने समजूत घालावी, त्याच्या रागामागील कारणांचा शोध घ्यावा. मुले मोबाइलवर काय बघतात, याकडे लक्ष द्यावे. अधिकच चिडचिडेपणा, राग येत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून तातडीने उपचार घ्यावा."- डॉ. रूपाली सरोदे, मानसोपचारतज्ज्ञ.