लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : 'स्किझोफ्रेनिया' हा एक मानसिक आजार आहे. या आजारात रुग्णाला अनेक भास होतात. त्याला असं वाटतं की, त्याच्या आजूबाजूला कोणीतरी आहे. त्यांना अशा गोष्टींचा भास होतो जी त्यांच्या आजूबाजूला नाही, पण तरीही ती आहेत असा अट्टाहास ते धरतात. त्यांच्या भावना तीव्र होतात. आपल्याविरोधात कुणीतरी कटकारस्थान करत आहे. आपल्याला खोटे ठरविण्याचा प्रयत्न होत आहे, असे या रुग्णाला सतत वाटत असते. परंतु वेळीच काळजी घेतल्यास या आजारावर नियंत्रण मिळवता येते, असा सल्ला मानसिक रोग तज्ज्ञांकडून दिला जातो.
'स्किझोफ्रेनिया' कसा ओळखायचा?झोप न लागणे, चित्रविचित्र भास होणे, मूड सतत बदलत राहणे, कोणतीही भावना तीव्र असणे, चिडचिड होणे व एकलकोंडेपणा आदी लक्षणे दिसतात.
'स्किझोफ्रेनिया'चा परिणाम काय?
- 'स्किझोफ्रेनिया' झाल्यामुळे तो रुग्ण कोणतेही काम लक्षपूर्वक करू शकत नाही.
- अशा रुग्णांना शालेय वयात अभ्यास करतानाही अडथळे येतात.
स्किझोफ्रेनिया' होण्याची कारणे 'स्किझोफ्रेनिया' हा आनुवंशिक असू शकतो. काहीवेळा तो सामाजिक तणावामुळे असू शकतो. मेंदुतल्या विशिष्ट केमिकलमध्ये बदल झाल्यानेही 'स्किझोफ्रेनिया' होऊ शकतो. जर एखाद्याच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला 'स्किझोफ्रेनिया' असेल तर त्याला 'स्किझोफ्रेनिया होऊ शकतो.
मानसिकरोग तज्ज्ञ काय सांगतात... 'स्किझोफ्रेनिया' हा आजार कोणत्याही वयोगटात कोणालाही होण्याची शक्यता असते. १५ ते २५ या वयोगटात या आजाराची सुरुवात होते.सामान्यतः हा आजार आयुष्यभरासाठीचा असतो. पण, तज्ज्ञांच्या मदतीने तो आजार असतानाही आपले आयुष्य सर्वसाधारणपणे जगू शकतो. त्यामुळे या आजारासंबंधीत लक्षणे दिसताच त्यांनी मानसिकरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे सांगतात.