वर्धा : बदललेली जीवनशैली, तणाव, अनुवांशिकता आदी कारणांमुळे महिलांमधील आजाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये गर्भाशय पिशवीच्या आजाराची संख्या अधिक आहे. अनेकांना तर ऐन चाळिशीमध्ये गर्भाशय काढून टाकावे लागत आहे. अनेकदा अनियमित मासिक पाळी, ओटीपोटातील दुखणे याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. महिला घरातील कामांमध्ये व कुटुंबांचा साभाळ करण्यातच अधिक वेळ घालवतात. त्यामुळे आजाराकडे सहाजिकच दुर्लक्ष होते. आता वेळीच काळजी घ्यावी, असे आवाहन स्त्रीरोग तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
गर्भाशय पिशवीचे आजार कोणते? पिशवीला गोळा येणे, एंडोमेट्रिओसिस, एडेनोमायोसिस, गर्भाशयाच्या अस्तराची जाळी वाढणे, गर्भाशयाचा कर्करोग आदी आजाराचा धोका असतो.
लक्षणे काय? गर्भाशयात वेदना, रक्तस्त्राव होणे, अनियमित मासिक पाळी, खालच्या ओटीपोटात किंवा गुदाशय क्षेत्रात वेदना, लघवी वाढणे, संभोगादरम्यान वेदना आदी लक्षणे असू शकतात.
काय काळजी घ्यायला हवी? अनियमित मासिक पाळीकडे दुर्लक्ष करू नये. मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीराची योग्य स्वच्छता ठेवावी, नियमित व्यायाम करावा व सुदृढ आहार घ्यावा.
तपासणी कधी करावी?वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर महिलांनी आपली नियमित तपासणी करावी. आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. आजारपण अंगावर काढू नये. प्रकृतीमध्ये काही बिघाड झाल्याचे लक्षात येताच तातडीने आरोग्य तंज्ज्ञाचा सल्ला घेण्याची गरज आहे.
कारणे काय? गर्भाशयाचा आजार होण्यामागे अनुवांशिकता, हार्मोनल असंतुलन, थायरॉइड समस्या, सतत तणावग्रस्त जीवनशैली, शरीराकडे दुर्लक्ष करणे, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे गर्भाशयाच्या समस्या उद्भवण्याचा धोका अधिक असतो.
स्त्रीरोग तज्ज्ञ काय म्हणतात... "महिलांमध्ये गर्भायशाचे वाढलेले आजार ही एक मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे महिलांनी अनियमित पाळी, रक्तस्त्राव आदी लक्षणे दिसून आल्यास लगेच स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. यासोबतच शरीर स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. सुदृढ आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम करावा." - डॉ. स्मिता पावडे, स्त्रीरोगतज्ज्ञ, वर्धा.