लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : हिंगणघाट येथील घटनेच्या निषेधार्थ गावात बुधवारी कडकळीत बंद पाळण्यात आला. शिवाय मुख्य मार्गाने निषेध मोर्चा काढून नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. या मोर्चात तरुण-तरुणींसह महिला-पुरुष तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा पोलीस चौकी येथे पोहोचताच विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पोलिसांना पोलीस चौकी प्रमुखांना सादर केले.प्राध्यापिकेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. पीडितेला भरीव शासकीय मदत देण्यात यावी. आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. सकाळी सर्व पक्षीयांच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चाने गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. मोर्चात गावातील वयोवृद्ध महिला-पुरुषांसह शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनी, अंगणवाडी सेविका, शिक्षक, शिक्षिका, मदतनिस, महाविद्यालयीन तरुणी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर गावातील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेऊन आंदोलनाला पाठींबा दिला. बंदमुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. या घटनेमुळे पीडितेचे आयुष्य उद्वस्त झाल्याने तिच्या कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणीही या मोर्चाच्या माध्यमातून रेटण्यात आली. मोर्चात प्रशांत चौधरी, हरिष धोटे, वाल्मिक देवढे, संदीप देशमुख, आशिष देशमुख, रिझवान खान, आशिष शिंदे, प्रा. किरण उरकांदे, जि. प. सदस्य चंद्रकांत ठक्कर, माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, पं. स. सभापती महेश आगे, प्रवीण काटकर, शरद कांबळे, हेमंत मगरुळकर, डॉ. संजय शेंद्रे, बाबा निवल, रमेश वाळके, मनोज तापडिया, सूर्यकांत देशमुख, प्राचार्य देविदास देवढे, प्रा. जनार्धन मते, वैभव खुळे, सुनील ढाले, गौरव देशमुख, प्रफुल मोते यांच्यासह यशवंत विद्यालय, यशवंत महाविद्यालय, सरस्वती विद्या मंदिर, भैयासाहेब उरकांदे विद्यालय, आॅक्सफोर्ट पब्लिक स्कूल मधील शिक्षक, शिक्षिका तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.
वायगाव कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST