लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : येथील नगर पंचायत कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त ठरली आहे. तीन वर्षात नगर पंचायतीच्या बेताल कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने त्यांच्यात असंतोष खदखदत आहे. मागील चार दिवसांपासून नळ योजना बंद असल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प आहे. कामगारांचा गेल्या तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने त्यांनी १४ जानेवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी, शहरातील साफसफाई, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आदी सर्व कामे ठप्प आहेत. चार दिवसांपासून पथदिवेही रात्रंदिवस सुरूच आहेत. कामगारांचे वेतन न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
"पाणीपुरवठा करणारी मोटार बंद पडल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. लवकरच मोटारची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल." - प्रदीप डगवार, सभापती, पाणीपुरवठा विभाग
"मी सहा महिन्यांपासून नगर पंचायतीत कामगार म्हणून कार्यरत आहे. मात्र, आम्हा कामगारांना मागील दोन महिन्यांपासून वेतनच दिलेले नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे."- संतोष वानखेडे, कामगार
"मी रोज हिंघणघाटवरून कामासाठी नगर पंचायतीत येतो. माझ्या पत्नीला लकवा मारला असून, तिला उपचारासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. घरी जेवणासाठीदेखील कवडी नाही. माझे तीन महिन्यांचे वेतन थकीत आहे. मुलांचे शिक्षण आणि अन्न पाण्यासाठी देखील पैसा नाही. याकडे लक्ष द्यावे." - विनायक सिडाम, कामगार
"कामगारांना त्यांचे वेतन न झाल्याची माहिती आहे. वेतन मिळण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. येत्या सोमवारी कामगारांच्या पगाराची तरतूद करण्यात येणार आहे." - पौर्णिमा गावित, मुख्याधिकारी, नगर पंचायत