अध्यक्षाची मनमानी : इतरांची पिके राहतात असिंचितआकोली : सिंचन प्रकल्पांतून सध्या शेतकऱ्यांच्या पिकांकरिता पाणी सोडण्यात आले आहे. यात पाणी वाटप सहकारी संस्थेचा अध्यक्ष स्वत:चे ओलित होईपर्यंत कालव्याचे गेट बंद करतात. यामुळे अन्य शेतकऱ्यांची पिकांचे सिंचन रखडले आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.आंजी-बोरखेडी तलाव पाणी वाटप सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश ढोकणे हे स्वत:चे व आप्तांचे सिंचन होईपर्यंत इतर गेट बंद ठेवतात. यामुळे वैफल्यग्रस्त शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. शिवाय पाणी कराची रक्कम जमा करून पावती दिली जात नसल्याची ओरड होत आहे. आंजी-बोरखेडी तलावाच्या लाभ क्षेत्रात मदनी, आमगाव, आंजी व बोरली शिवारातील शेती येते. यातील ऊस पिकासाठी ५ हजार २०० रुपये हेक्टर व इतर पिकांसाठी २ हजार रुपये भरून सिंचनासाठी पाणी घेता येते. येथील गेटच्या चाव्या संस्थाध्यक्ष कर्मचाऱ्यांकडे न देता स्वत:कडे ठेवतात. संस्थाध्यक्षाचा दहा एकरात ऊस असून इतर नातेवाईकांचाही ऊस आहे. आपल्या पिकांचे ओलित होईपर्यंत इतर गेट बंद ठेवले जात असल्याची ओरड शेतकऱ्यांतून होत आहे. येथील तलावाचे व्यवस्थापन दहेगाव (गोंडी) कार्यालयाकडे असून शाखा अभियंत्याचा वचक नाही. अध्यक्ष ढोकणे यांनी मुख्य कालव्यात सिमेंटचा चबुतरा बांधून पाण्याला अवरोध निर्माण केला. यामुळे त्यांच्या शेतात अधिक पाणी येते तर इतरांना बांधावर वाट पाहावी लागते. पाणी कर नगदी भरण्याऱ्या शेतकऱ्यांची नावे साखर कारखान्याला वसुलीकरिता दिलेल्या यादीत समाविष्ट केली असून एकाच पाणी कराची दोन वेळा वसूली केली जात आहे.(वार्ताहर)
गेट बंद ठेवून अडविले जाते पाणी; शेतकरी त्रस्त
By admin | Updated: November 1, 2015 02:37 IST