स्वच्छ-सुंदर शहरासाठी वर्धा पालिकेचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 05:00 AM2021-02-26T05:00:00+5:302021-02-26T05:00:32+5:30

वर्धा नगरपालिकेची गुरुवारी ऑनलाईन सर्वसाधारण सभा पार पडली. यासभेत सन २०२०-२०२१ च्या सुधारित तर सन २०२१-२०२२ च्या प्रस्तावित अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. कोरोनाकाळामुळे कर वसुली व शासन अनुदान कपातीच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहराचा विकास थाबू नये म्हणून यावर्षी ३९ लाख ८३ हजार १६९ रुपयांच्या शिल्लकी अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. 

Wardha Municipality budget for a clean and beautiful city | स्वच्छ-सुंदर शहरासाठी वर्धा पालिकेचा अर्थसंकल्प

स्वच्छ-सुंदर शहरासाठी वर्धा पालिकेचा अर्थसंकल्प

Next
ठळक मुद्दे२१९ कोटी ४८ लाखांच्या प्रस्तावित अंदाजपत्रकाला दिली मंजूरी : शहरातील रस्ते बांधकाम, सौदर्यीकरणाला दिलेय प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा  : अमृत योजनेमुळे शहरात मजबूत सिमेंट रस्त्यांची वाट लागली आहे. त्यामुळे वर्धेकरांना पूर्वीप्रमाणे गुळगुळीत रस्ते मिळणार की नाही, अशी भीती होती. पण, आता नगरपालिकेने सन २०२१-२०२२ करिता २१९ कोटी ४८ लाख ६१ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली असून यामध्ये रस्त्यांसह स्वच्छ व सुंदर शहराकरिता सर्वाधिक निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या काळात हा ‘अर्थ’ संकल्प शहराचे रुपडे पालटविणारा ठरणार आहे.
वर्धा नगरपालिकेची गुरुवारी ऑनलाईन सर्वसाधारण सभा पार पडली. यासभेत सन २०२०-२०२१ च्या सुधारित तर सन २०२१-२०२२ च्या प्रस्तावित अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. कोरोनाकाळामुळे कर वसुली व शासन अनुदान कपातीच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहराचा विकास थाबू नये म्हणून यावर्षी ३९ लाख ८३ हजार १६९ रुपयांच्या शिल्लकी अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. 
यामध्ये शहरातील आर्वीनाका, इंदिरा गांधी चौक, सुभाषचंद्र बोस चौक, लालबहादूर शास्त्री चौक, सहरदार वल्लभभाई पटेल चौक व इतर चौकांच्या सौदर्यीकरणाकरिता १ कोटी ३५ लाख तर शहरात दुभाजक तयार करुन सुशोभिकरण करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून १ कोटी २६ लाख व नगरपालिका फंडातून ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. भुयारी गटार योजनेमुळे कमकुवत झालेल्या रस्त्यांना मजबूत करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून २ कोटी, १५ व्या वित्त आयोगातून १ कोटी ५० लाख तर दलित वस्ती निधी अंतर्गत २ कोटीची तरतूद केली आहे. याशिवाय शहरातील विविध प्रभागामध्ये रस्ते व नाल्यांचे बांंधकाम करण्यासाठी ११ कोटी ७० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. 
या अर्थसंकल्पीय सभेला नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, मुख्याधिकारी विपीन पालिवाल यांच्यासह बांधकाम सभापती पवन राऊत, आरोग्य सभापती प्रतिभा बुरले, पाणीपुरवठा सभापती शुभांगी कोलते, शिक्षण सभापती आशिष वैद्य, महिला व बालकल्याण सभापती रंजना पट्टेवार आणि उपसभापती सुमित्रा कोपरे तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. 
लेखापाल भुषण चित्ते यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले तर संगणक अभियंता संदीप पाटील यांनी ऑनलाईनकामकाज सांभाळले.
 

‘माझी वसुंधरा’अभियान करिता १ कोटीचा निधी
माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण उपक्रमांना चालना देणे, होम कम्पोस्टींग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्षारोपण, जैवविविधता सर्वधन आणि स्वच्छभारत अभियानांतर्गत चौक सौदर्यीकरण, दुभाजक सौदर्यीकरण, सफाई मशीन, घनकचरा व्यवस्थापन, सफाई कामगारांच्या कुशलतेत वाढ करणे, दिशादर्शक फलक आदींवर १४ वा वित्त आयोग, अमृत प्रोत्साहन निधी, उत्कृष्ट नगरपरिषद या निधीअंतर्गत १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. विविध बगिच्यांचा विकास वैशिष्ट्यपूर्ण योजना व उत्कृष्ट नगरपरिषद निधी मधून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान अमृत योजनेतून नागरिकांकरिता उपलब्ध होणार आहे.

वर्धा शहरातील नागरिकांकरिता सुंदर, स्वच्छ व स्वस्थ शहर साकार करण्यासाठी नगर पालिकेने २१९ कोटी ४८ लाख ६१ हजार ६०० रुपयाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. यात काही नाविन्यपूर्ण बाबींचाही समावेश आहे. पालिकेची सुसज्ज अशी इमारत पूर्णत्वास गेली असून आता वर्धेकरांसाठी अत्याधूनिक मॉल साकारला जाणार आहे.
अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा
 

यात नाविन्यपूर्ण काय?

सामान्य रुग्णालयासमोरील जुन्या नगरपालिकेच्या जागेवर अत्याधुनिक शॉपिंक मॉल तयार करणार असून त्याकरिता १४ व्या वित्त आयोगातून ४ कोटी, पालिकेकडून ७ कोटी ८० लाख तर १८ कोटी २ लाख कर्जस्वरुपात घेतले जाणार आहे.
पालिकेच्या अण्णाभाऊ साठे सभागृहाचे रुपांतर अण्णाभाऊ साठे अभ्यासिकामध्ये करुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करुन दिले जाणार आहे. वृद्धांना वाचनछंद जपण्यासाठी घरपोच पुस्तके पोहचविण्याकरिता आयटी बेस सुविधा पुरविण्यात येणार आहे. 
यासोबतच केंद्र शासन पुरस्कृत टीयूएलआयपी उपक्रम योजनेंतर्गत सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना शासकीय कामकाजाचा अनुभव प्राप्त होईल, याकरिता अमृत प्रोत्साहन निधी मध्ये तरतूद करण्यात आली आहे. 
 

दुर्बल घटांकाकरिता मिळणार ७५ लाखांचा निधी
दिव्यांगाना ५ टक्के निधी देण्यासाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय दिव्यांग सबलीकरण पेन्शन व बेरोजगार भत्ताकरिता २५ लाख, दुर्बल व मागासवर्गीयांच्या ५ टक्के निधीकरिता २५ लाख तर महिला व बालविकासच्या ५ टक्के निधीकरिता सुद्धा २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. नगरपालिकेने दुर्बल घटकांच्या योजनांकरिता या अर्थसंकल्पात एकूण ७५ लाखांची तरतूद केली आहे.

 

Web Title: Wardha Municipality budget for a clean and beautiful city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.