प्रशांत हेलोंडे - वर्धा‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे!’ या ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वप्नातील वृक्षांचे नंदनवन साकार करण्यासाठी राज्य शासनाच्या अनेक शासकीय कार्यालयीन पुढाकार घेतला आहे़ वृक्षारोपणासह वनसंवर्धनामध्येही वर्धा जिल्हा अग्रेसर ठरला आहे़ यात सामाजिक वनिकरण, वन विभाग, कृषी विभागासह जिल्हा परिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनीही पुढाकार घेतला़ यामुळेच वर्धा जिल्हा प्रशासनाला वृक्षारोपण व संवर्धनाच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचता आले आहे़ वर्धा जिल्ह्यात सामाजिक वनिकरण आणि वन विभागाने रोपवाटिका तयार केल्या आहेत़ सामाजिक वनीकरण विभागाने जिल्हाभर एकूण ४४ रस्त्यांची वृक्षारोपणाकरिता निवड केली होती़ या रस्त्यांवर ४३ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली़ यामुळे वृक्ष लागवडीमध्ये स्वत:ची जागा नसताना सामाजिक वनीकरण विभाग जिल्ह्यात अव्वल ठरला आहे़ जिल्ह्यात एकूण ९ रोपवाटिका सामाजिक वनीकरण विभागाने तयार केल्या आहेत़ या रोपवाटीकांमध्ये २ लाख ५० हजार रोपे तयार करण्यात आली़ यंदाही रोपवाटीका तयार करण्यात येत असून ५ लाखांवर वृक्षांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे़ मागील वर्षी ३२ हजार ९२३ रोपांचे पहिल्या टप्प्यात तर १० हजार रोपांचे दुसऱ्या टप्प्यात रोपण करण्यात आले़ यासाठी जिल्ह्यातील ४४ रस्त्यांची निवड करण्यात आली़ या रस्त्यांच्या कडेला एकूण ४३ हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले़ या रोपांभोवती संरक्षणासाठी काटेरी कुंपण तयार करण्यात आले आहे़ यानंतर ११ हजार जाळ्यांचे कठडेही तयार करण्यात आले़ वर्धा तालुक्यात सेवाग्राम, करंजी (भोगे), मांडवगड-धानोरा, धानोरा-धानखेडा, धामणगाव ते धामणगाव (फाटा), डोरली फाटा ते डोरली, दहेगाव मिस्कीन, आंबोडा, आंजी ते पुलई, मांडवा, झाडगाव, तिगाव-दिग्रस, साठोडा-महाकाळ या रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड करण्यात आली़ या वृक्षांच्या संवर्धनाचीही विशेष सोय करण्यात आली होती़ यात काही ठिकाणी मजूर लावून झाडांना पाणी देण्यात आले तर काही ठिकाणी सामाजिक वनिकरणच्या कर्मचाऱ्यांनी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी पार पाडली़हिंगणघाट तालुक्यात प्रमुख ३ रस्त्यांची निवड करण्यात आली़ यात हिंगणघाट ते कडाजना, शेगाव कुंड-पांजरा, कडाजना, सावली (वाघ) या रस्त्यांचा समावेश आहे़ समुद्रपूर तालुक्यातील लसनपूर, गिरड, वायगाव, हळदगाव, पाईकमारी-खैरगाव, वडगाव पाटी ते वडगाव, सेलू तालुक्यात केळझर-वडगाव, सेलू ते सुकळी (स्टे़), सुकळी बाई ते आंजी (मोठी), देवळी तालुक्यात विजयगोपाल ते इंझाळा, बाभुळगाव ते भिडी, कारंजा तालुक्यात नारा ते सुसुंद्रा, नारा ते तरोडा, आर्वी तालुक्यात सावळापूर ते बेडोणा, पिंपळखुटा ते बोथली, तरोडा ते किन्हाळा, धनोडी ते खूबगाव तर आष्टी तालुक्यातील बोरखेडी-थार-पार्डी, लहानआर्वी-अंतोरा, पिलापूर ते येनाडा, येनाळा ते देलवाडी, जोलवाडी ते अंबिकापूर या रस्त्यांच्या कडेला वृक्ष लागवड करण्यात आली़ वन विभागाच्यावतीने वन संवर्धनाकरिता विविध उपक्रम राबविले जातात़ यात वन विभागाच्या जागेवर रोपवाटीका निर्माण करणे, वृक्षारोपण करणे, झुडपी जंगल तयार करणे आदी उपक्रमांचा समावेश आहे़ मागील वर्षी जिल्ह्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनाही राबविण्यात आली़ यात प्रत्येक शासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्दिष्ट देण्यात आले होते़ बहुतांश ठिकाणी उद्दिष्ट पूर्ती झाली असून बऱ्यापैकी झाडेही जगली आहेत़ वर्धा जिल्ह्यात एकूण ४२ कोटी ९५ हजार वृक्षांच्या रोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ यात ३० लाख ९४ हजार ३०२ वृक्षांचे रोपण करण्यात आले होते तर सर्वेक्षण झाल्यापैकी ६ लाख ५७ हजार ८८ वृक्ष जगल्याचे नमूद करण्यात आले आहेत़ जिल्हा परिषद, कृषी विभाग आणि अन्य संस्थांद्वारे झालेल्या वृक्षारोपणाचे सर्वेक्षण झालेले नाही़ यामुळे जगलेल्या झाडांचा अचूक आकडा प्रशासनालाही सांगता आलेला नाही; पण वर्धा जिल्हा वृक्षारोपण व संवर्धनात आघाडीवरच दिसतो़
वनसंवर्धनात वर्धा जिल्हा अग्रेसर
By admin | Updated: July 23, 2014 00:08 IST