सचिन देवतळे विरुळ(आ.)येथून दोन किमी अंतरावर असलेले बाऱ्हा हे गाव दोन वर्षापासून शेतात ठोकलेल्या पालवजा झोपडीमध्येच वास्तव्यास आहे. ग्रामस्थांना शासन प्रशासनाची कुठलीही मदत मिळालेली नाही. बाऱ्हा येथील कुटुंबांचे पुनर्वसन न केल्याने त्यांना वर्षभरापासून अंधाऱ्या रात्रीत सरपटणाऱ्या प्राण्याच्या सानिध्यात चिमुकल्यासह जगावे लागत आहे़बोरी-बाऱ्हा या गावात कोलाम आदिवासी बांधवाची वस्ती आहे़ मोल-मजुरी करून नेथील नागरिक आपल्या संसाराचा गाडा हाकतात. बाऱ्हा गावाला लागूनच एक मोठा तलाव आहे़ दोन वर्षापूर्वी हा तलाव तुंडूब भरला होता. तलाव फुटण्याच्या भीतीने प्रशासनाने बाऱ्हा येथील कुटुंबांचे स्थलांतर करून एका शेतात पाल टाकून त्यांची राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करून दिली. परंतु कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. त्यामुळे पावसाळ्यातही येथील विस्थापितांना पावसाळ्यातही शेतामध्ये दिवस काढावे लागले. येथे कोणतीही शासकीय योजना पोहचली नसल्याने सहा ते सात महिन्यांनी काही गावकरी गावात राहायला गेले. पण काही कुटूंबे अजूनही या शेतातच राहत आहे़ दोन वर्षापासून हे गावकरी पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहे़ अद्याप साधी वीजही येथे पोहचली नाही़ पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही़ बाकी कुटुंब परत पावसाळा आला की याच शेतात राहायला येतात़ हे गाव सध्या पूर्णपणे भकास झाले आहे़ गावात कोणतीच सोय नाही़ कितीतरी काळापासून ग्रामस्थ बोरी-बाऱ्हा ते विरूळ या रस्त्याची मागणी करीत आहे. परंतु शासनाद्वारे अद्याप रस्त्याची मागणी पूर्न करण्यात आलेली नाही. बाजाराचे ठिकाण असल्यामुळे येथील नागरिकांना नेहमीच विरूळला यावे लागते़ पावसाळ्यात कंबरभर पाण्यातून दोन कि़ मी़ चा प्रवास करावा लागतो. राहायला घर नाही, जाण्यासाठी रस्ता नाही़ रोगराई पसरल्यावर डॉक्टर नाही़ त्यामुळे विरूळ किंवा पुलगाव येथे बैलबंडीने किंवा पायी जात दवाखाना गाठावा लागतो़ अतिवृष्टी झाली की घरांना ओल चढते. आजार पसरतात. पण वैद्यकीय सुविधेसाठी भटकावे लागते. यंदा जिल्ह्यात पाऊस कमी झाला. त्यामुळे लोकांच्या हाताला विशेष काम नाही. त्यामुळे आधीच नैराश्य पसरले असताना ही परिस्थिती त्यांना आनखी निराश करीत आहे. त्यामुळे हाताला कम मिळावी अशी अपेक्षाही नागरिक व्यक्त करीत आहे. मंगळवारी मध्यरात्री जिल्ह्याला अचानक वादळी पावसाने झोडपून काढले. या वादळाचा कटका येथील शेतात पाल टाकून वास्तव्यास असलेल्या कुटूंबांनाही बसला. त्यामुळे तात्काळ विस्थापितांचे पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थ वर्षभरापासून करीत आहे.
दोन वर्षांपासून पुनर्वसनाची प्रतीक्षा
By admin | Updated: February 18, 2015 01:54 IST