रोहणा : परिसरातील शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. सोयाबीनने दगा दिल्याने शेतकऱ्यांना कापसाचाच आधार आहे. पण येथील जीनमध्ये शासकीय किंवा खासगी यापैकी कोणतीच खरेदी सुरू न झालेली नाही. त्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत आहे. कापूस उत्पादकांना खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. यातही दिवाळी साजरी करण्याकरिता गरजू शेतकरी आपल्या जवळचा कापूस मिळेल त्या भावात खेडा व्यापाऱ्यांना विकत आहे. यात त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची ही लुट थांबविण्याकरिता येथे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. रोहणा येथे कापूस प्रक्रिया संस्था आहे. येथे पाणी, अद्यावत यंत्रसामुग्री मजुरांची उपलब्धता आहे. येथे शासकीय व खासगी व्यापारी कापूस खरेदी करण्याची मागणी आहे. येथील केंद्रावर कापसाची आवक देखील बऱ्याच प्रमाणात असते. यावर्षी सोयाबीन या पिकाने बळीराजाला मोठा धक्का दिला. ज्या शेतकऱ्यांनी कापणी व मळणी केली त्यांचा खर्च उत्पादनातून निघाला नाही. त्यामुळे केवळ निराशाच पदरी पडली. अनेकांनी तर कापणी केलेल्या शेतकऱ्यांचा अनुभव पाहून शेतातील सोयाबीनची कापणी करण्याऐवजी त्यात जनावरे चारली. परिणामी ऐन दिवाळीच्या पर्वावर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दिवाळी सणाच्या न्युनतम गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना कापसाचा आधार होता. मात्र येथे खरेदी केंद्र नसल्याने त्यांची फजिती झाली. बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात पाच ते दहा क्विंटलच्या सरासरीने कापूस आला आहे. तो विकून दिवाळी साजरी करावी तर स्थानिक कापूस खरेदी केंद्रात अजूनही कापूस खरेदी सुरू झाली नाही. दिवाळीची गरज लक्षात घेता खासगी व्यापारी दररोज कापसाच्या भावात घट करीत आहे. ‘सरकी उतरली, गाठीचे भाव पडले’ अशी कारणे सांगून व्यापारी वर्ग कापूस उत्पादकांना नाडविण्याची संधी सोडायला तयार नाही. कापसाचा हमीभाव ४ हजार १०० रुपये असताना ३ हजार ७०० ते चार हजार रुपये कापसाची खेडा व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू आहे. काही शेतकरी आपला कापूस मालवाहू गाडीत भरून आर्वी येथे विक्रीस नेत आहे. त्यात त्यांना ५० रुपये जास्त मिळतात तर गाडी भाडेमध्ये मोठी रक्कम खर्ची लागते. याकरिता येथे खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे झाले आहे. त्याचा आर्थिक फटका गरजू कापूस उत्पादकांना सहन करावा लागत आहे. परिसरातील बराच कापूस बाहेर गेल्यावर स्थानिक केंद्र सुरू झाल्यास केंद्रातील संकलनावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना केंद्राची प्रतीक्षा आहे.(वार्ताहर)
कापूस उत्पादकांना खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा
By admin | Updated: November 14, 2015 02:28 IST