सुहास घनोकार ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एसटी बस नेमकी कुठे आहे, हे आता प्रवाशांना घरबसल्या आणि कुठेही कळणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने लवकरच सर्व बसगाड्यांना आगामी काळात व्हीटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम) बसविले जाणार आहे. राज्यातील आगारांना शिवशाही या आरामदायक गाड्या उपलब्ध करून दिल्यानंतर विज्ञान-तंत्रज्ञानानेही हायटेक होत असल्याने महामंडळाचे पाऊल पुढे पडते आहे.व्हीटीएस यंत्रणा बसविण्याकरिता महामंडळाच्या वतीने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील बसथांब्यांचे मॅपिंग झालेले असून वर्धा विभागात २६६ बसगाड्या आहेत. कार्यरत २३७ बसगाड्यांना ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.एसटी महामंडळाच्या वतीने पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येत असलेली व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम (व्हीटीएस) निवडणुकीपूर्वी मुंबई-पुणे मार्गावर राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, गावखेड्यापर्यंत पोहोचलेल्या एसटी थांब्याचे मॅपिंग करण्याचे आव्हान महामंडळ प्रशासनासमोर होते. वर्धा विभागात बसगाड्यांत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी उपकरणे साहित्य उपलब्ध झाले असून आगामी एक-दोन महिन्यांत सर्वच बसगाड्यांत ही यंत्रणा कार्यान्वित झालेली असणार आहे.महामंडळातर्फे राज्यातील ३० हजारांहून अधिक थांब्यांचे मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे. ३ हजारांहून अधिक बसगाड्यांना ही व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसविण्यात आले आहे. युद्धपातळीवर सुरू असलेल्या या कामाच्या पुढील टप्प्यात वर्धा, जालना, जळगाव, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे या विभागातील गाड्यांना व्हीटीएस बसविण्यात येणार आहे.नूतन वर्षापूर्वी प्रवाशांना एसटी बसच्या प्रत्येक गाडीचे ठिकाण घरबसल्या आणि कुठेही कळू शकणार आहे. महामंडळाच्या या व्यवस्थेमुळे आता शहरीच नव्हे तर ग्रामीण प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.बसगाडीला विलंब झाल्यास प्रवाशांना प्रतीक्षेत तासन्तास बसस्थानकावर ताटकळत बसावे लागते. आगामी काळात बसगाड्यांना व्हीटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम) बसविण्यात आल्यानंतर प्रवाशांना बसचे निश्चित ठिकाण कळणार असून यामुळे त्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळणार आहे.- चेतन हसबनीस, विभाग नियंत्रक, वर्धा विभाग.
वर्धा विभागातील २३७ बसगाड्यांना ‘व्हीटीएस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST
एसटी महामंडळाच्या वतीने पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येत असलेली व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम (व्हीटीएस) निवडणुकीपूर्वी मुंबई-पुणे मार्गावर राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, गावखेड्यापर्यंत पोहोचलेल्या एसटी थांब्याचे मॅपिंग करण्याचे आव्हान महामंडळ प्रशासनासमोर होते. वर्धा विभागात बसगाड्यांत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी उपकरणे साहित्य उपलब्ध झाले असून आगामी एक-दोन महिन्यांत सर्वच बसगाड्यांत ही यंत्रणा कार्यान्वित झालेली असणार आहे.
वर्धा विभागातील २३७ बसगाड्यांना ‘व्हीटीएस’
ठळक मुद्देघरबसल्या कळेल अचूक ‘लोकेशन’ : महामंडळ होतेय हायटेक