वर्धा : कोरडवाहू शेतीमध्ये कमी खर्चात कापसाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी सघन कापूस लागवड तंत्रज्ञान वापरात आणले जाते. या तंत्रज्ञानाला अनुसरुन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना पुढील प्रक्रियेकरिता मार्गदर्शन करण्यात आले. सेलू तालुक्यातील मदनी येथे शिवारफेरीचे कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी सघन कापूस लागवडीचे तंत्रज्ञान जाणून घेतले. शिवारफेरी कार्यक्रमात शेतकरी मनोहर गावंडे, सुनील दिघडे, भोंडे, मंदार देशपांडे यांच्या शेतात जाऊन पिकांच्या स्थितीची तज्ज्ञांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. परिसरातून आलेल्या गावकऱ्यांनी यावेळी तंत्रज्ञानाबाबत प्रश्न विचारुन माहिती जाणून घेतली. जिल्हा समन्वयक अतुल शर्मा यांनी मंदार देशपांडे यांच्या शेतात लागवड केलेले कपाशी बियाणे कोरडवाहू शेतीमध्ये पेरणीद्वारे दाट लागवड करुन एकरी ८ क्विंटलपर्यंत उत्पादन घेणे सहज शक्य आहे, असे सांगितले. पाण्याअभावी बी.टी. वाळत असताना हे बियाणे अजून हिरवे असून त्यावर लाल्याचा प्रादुर्भाव झाला नसल्याचे मत सहभागी शेतकरी साहेबराव भोंडे यांनी सांगितले. वेळेवर पेरणी आणि कीड व्यवस्थापन केल्यास कोरडवाहू जमिनीमध्ये बी.टी. कापसाला सघन कापूस लागवड तंत्रज्ञान उत्तम पर्याय म्हणून ठरू शकेल, असे मत दहेगाव(मि.) येथील शेतकरी सुभाष पोहनकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शेतकऱ्यांशी चर्चा करताना शर्मा यांनी सघन कापूस लागवड पद्धत तंत्रज्ञानाच्या विविध पैलुंवर प्रकाश टाकला. पेरणीची वेळ, एकरी झाडांची संख्या, योग्य व गरजेनुरुप किटकनाशकांचा वापर यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनात राष्ट्रीयस्तरावर हा प्रात्यक्षिक व प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविला जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली. यात रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालयाचा सहभाग आहे. ३५ गावातील १५४ शेतकऱ्यांनी १७४ एकरावर या तंत्रज्ञानाप्रमाणे लागवड केल्याची माहिती राजेंद्र खर्चे यांनी दिली. सचिन गावंडे, मनोहर भगत, सचिन कुमरे, सुकेशिनी मून यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)
ग्रामस्थांनी जाणून घेतले सघन कापूस लागवडीचे तंत्रज्ञान
By admin | Updated: November 5, 2015 02:30 IST