विविध ठिकाणी १५० भाविकांनी केले कुंडात विसर्जन वर्धा : घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी विराजमान झालेल्या बाप्पाला रविवारी निरोप देण्यात आला. वर्धेत यंदाच्या वर्षाला पर्यावरणपुरक विसर्जनाला अधिक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. वर्धा नगरपरिषदेसह विविध सामाजिक संघटनांच्यावतीने जागोजागी ठेवण्यात आलेल्या कुंडात सायंकाळपर्यंत एकूण १५० भाविकांनी विसर्जन केल्याची माहिती आहे. साऱ्यांचे लाडके दैवत असलेल्या गणराजाला आज भाविकांनी ढोल ताश्यांच्या निनादात निरोप दिला. गुलालाची उधळण तर कुठे डीजेच्या ठेक्यावर थिरकताना गणेशभक्त दिसून आले. जिल्ह्यात असलेल्या विविध घाटांवर सायंकाळपर्यंत ८२ मूर्तींचे विसर्जन झाल्याचे पोलीस विभागाच्यावतीने सांंगण्यात आले. विसर्जनाचा आकडा यापेक्षा अधिक असल्याचेही बोलले जात आहे. पवनार येथील धाम नदीवर विसर्जनाकरिता नागरिकांची चांगलीच गर्दी असल्याचे दिसून आले. येथे वाढत्या वाहनांच्या गर्दीमुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले.विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सर्वच चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याचे दिसून आले. तर पवनार येथील घटावरही विशेष बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे.
वर्धेत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला साथ
By admin | Updated: September 28, 2015 02:21 IST