लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाकडून लससाठा उपलब्ध होताच जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला गती दिली जाते, तर लस संपताच ही मोहीम थंडबस्त्यात पडते. एकूणच लसकोंडीमुळे जिल्ह्यात व्हॅक्सिनेशन मोहिमेला वेळोवेळी ब्रेक लागत ती कासवगतीनेच राबविली जात आहे. अशीच कासवगती कायम राहिल्यास जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला लसीचे दोन्ही डोस मिळण्यासाठी २०२२ उजाडू शकते, असे चित्र ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिॲलिटी चेक’मध्ये दिसून आले आहे. उल्लेखनीय म्हणजे जुलै महिन्यात आरोग्य विभागाने लससाठा मिळताच वेळोवेळी लसीकरण मोहिमेला गती दिली. त्याला वर्धा जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा स्वयंस्फूर्तच प्रतिसाद मिळाला. परिणामी, वर्धा जिल्ह्याला मुबलक लससाठा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
अद्याप पहिलाच डोस मिळेना...
आठवड्यातून काही मोजक्याच दिवशी जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. शिवाय, सध्या प्रत्येक केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. नागरिकांची गर्दी बघून मी स्वत: दोन वेळा लसीकरण केंद्रावरून घरी परतले. लवकरच आपण कोविडची लस घेऊ.सुप्रिया जायले, वर्धा.
सध्या प्रत्येक केंद्रावर लस घेणारे तोबा गर्दी करीत आहेत. त्यामुळे आपणही लसीकरण केंद्रावर जाण्याचे टाळत आहे. मात्र, आपण लवकरच कोविडची लस घेऊ.- राखी वरभे, वर्धा.
शासनाकडून वर्धा जिल्ह्याला अल्प लससाठा देऊन लसकोंडी केली जात आहे. कोविशिल्डच्या ९० हजार तर कोव्हॅक्सिनच्या १० हजार डोसची मागणी आरोग्य विभागाने शासनाकडे नोंदविली आहे. परंतु, प्रत्येक वेळी तोकडा लससाठा वर्धा जिल्ह्याला दिला जात आहे. याचाच परिणाम सध्या लसीकरण मोहिमेवर होत आहे.
४.८० लाखांचा टप्पा केला पारशासनाकडून वर्धा जिल्ह्याची लसकोंडीच केली जात असली तरी तोकड्या लससाठ्याच्या जोरावर आरोग्य विभागाने आतापर्यंत लसीचे ४ लाख ८० हजार ९३७ डोस दिले आहेत. शिवाय, लससाठा उपलब्ध होताच लसीकरण मोहिमेला गती दिली जात असून, जिल्ह्याला मुबलक लससाठा देण्याची मागणी आहे.