लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने चार-पाच दिवसांपूर्वी जोरदार पुनरागमन केल्याने जिल्ह्यातील सर्वच जलाशयांची पाणीपातळी वाढली आहे. परिणामी अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांच्या सीमेवर मोर्शी येथे असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे सात गेट उघडून २ हजार १३८ घ. मी. प्र. से. पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा नदीवरील आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाचीही पाणीपातळी चांगली वाढली. परिणामी या प्रकल्पाचे ३१ गेट उघडण्यात आले असून, त्यातून ३ हजार ३५.२४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वर्धा नदीसह लगतचे नदी-नालेही ओसंडून वाहायला लागले आहे. आर्वी तालुक्यातील बहुतांश पुलावरून पाणी असल्याने वाहतूकही प्रभावित झाली. या पुराचा सर्वाधिक फटका आर्वी तालुक्यातील गावांना बसला असून, घरांची पडझड झाली तर दोघांना जीवही गमवावा लागला. दोन्ही प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण ६ हजार ४४९.९३ मि.मी.तर सरासरी ८०६.२४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.