विरूळ (आकाजी) : स्थानिक भवानी वॉर्ड येथील दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. परंतु या सिमेंट रस्त्याच्या कामात संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून गैरप्रकार केल्याचा आरोप ग्रा.पं. सदस्य कल्पना मानकर व नागरिकांनी निवेदनाद्वारे केला आहे.भवानी वॉर्ड येथील दलित वस्तीतील रस्त्याची मागणी मागील २५ ते ३० वर्षांपासून नागरिक करीत होते. ही मागणी पूर्ण होवून हा रस्ता तयार करण्यात आला. परंतु या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने नागरिकांत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत संबंधित ग्रामसेवकाने रस्त्याच्या कामात नाल्याची माती मिश्रीत रेती वापरत असल्याची तक्रार करून ठेकेदाराला दुसरी रेती आणण्याचा सल्ला दिला. तरीही हीच रेती वापरल्याची शंका नागरिक व्यक्त करीत आहे. नागरिकांनी सुद्धा नाल्याची रेती वापरण्यात विरोध केला होता. परंतु विरोधाला न जुमानता ठेकेदाराने काम पूर्ण केल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहे.रस्त्याचे काम प्राकलनानुसारही करण्यात आले नसून रस्त्याची जाडीही कमी आहे. त्यामुळे या रस्त्यात गैरप्रकार झाल्याचा आरोप ग्रा.पं. सदस्य व नागरिकांनी केला आहे. याबाबत ग्रामसेवकाला तक्रार देवूनही कोणतीच कारवाई झालेली नाही. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी आर्वीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.(वार्ताहर)
सिमेंट रस्त्याच्या कामात गैरप्रकार
By admin | Updated: August 1, 2015 02:33 IST