हत्येचा संशय : एकांबा शिवारातील घटनापुलगाव : शेतातील कार्यक्रम आटोपून नाचणगावकडे पायदळ येत असलेल्या दोघांना मागाहून येत असलेल्या एमएच ३२ डब्ल्यू-८०९३ ने जबर धडक दिली. यात एजाज अली अजाज अली (३०) रा. नाचणगाव याचा जागीच मृत्यू झाला तर शेख असलम शेख उस्मान (४०) रा. बोरगाव (मेघे) याला उपचारार्थ नेत असताना वाटेत मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास एकांबा शिवारातील घडली. हा अपघात नसून हत्या असल्याची तक्रार मृतकाचे नातलग मुजाहिद अली आझाद अली यांनी पुलगाव पोलीस ठाण्यात केली आहे. यामुळे या अपघाताला वेगळेच वळण येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक एजाज अली व शेख असलम हे दोेघे एकांबा येथील त्यांच्या मित्राच्या शेतातून जेवणाचा कार्यक्रम आटोपून नाचणगावला पायी परत येत होते. गावापासून काही अंतरावर येताच मागून येणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की एजाज अलीचा जागीच मृत्यू झाला. यात जखमी झालेल्या शेख असलमला पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर वर्धेला पाठविण्यात आले. दरम्यान वाटेत त्याचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पण दुचाकी वाहन चालकाच्या चेहऱ्यास मात्र खरचटल्याशिवाय दुसरा कुठलाही मार नाही. शिवाय धडकेत वाहनाचे काहीच नुकसान झाले नसल्याने हा खून असल्याची जोरदार चर्चा शहरात आहे. दुचाकी वाहनाचे समोरचे लाईट बंद असल्याने हा अपघात झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी दुचाकी चालक प्रफुल्ल मधुकर लोणकर याच्यावर भादंविच्या ३०४ अ, २७९, ३३६, ३३८, मोटार वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल केला तपास पुलगाव पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
दुचाकी अपघातात दोन ठार
By admin | Updated: October 25, 2014 22:44 IST