अजय मसराम यांच्या गीतांची मैफल : गाण्यांमधून केले ज्वलंत प्रश्नांवर भाष्यवर्धा : आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरेला गोंडीबोलीचे जणू वरदान लाभले आहे. समृद्ध वनसंपदेच्या सानिध्यात राहून टक्केटोणपे खाल्लेल्या म्हणजे संगीतशास्त्राच्या भाषेत रियाज पूर्ण झालेल्या गोंडीबोलीतून पारंपरिक गीतांचे सादरीकरण झाले की, कुणाचीही पावले थिरकायला लागतात. मात्र या थिरकण्याने आयुष्यातील अंधार दूर होणार नाही. त्याला प्रबोधनाचीच गरज आहे. याच जाणिवेतून नागपुरातील प्रसिद्ध आदिवासी गायक अजय मसराम यांच्या प्रबोधन गीतांची मैफल स्थानिक आयटीआय टेकडीवरील बिरसा मुंडा क्रीडा संकुलात रविवारी पहाटे आयोजित करण्यात आली होती.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, पोलीस उपअधीक्षक (गृह) रवींद्र किल्लेकर, सेवानिवृत्त विक्रीकर आयुक्त ज्ञानेश्वर मडावी, जंगल कामगार सहकारी संस्थेचे बापूराव उईके, नगरसेवक शरद आडे, ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव मडावी, वर्धा जिल्हा संयुक्त आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष राजू मडावी, हरिदास टेकाम, चंद्रभान खंडाते व इतर मान्यवर उपस्थित होते. अजय मसराम यांनी या मैफलीत २५ गोंडीगीते सादर केली. आदिवासींची संस्कृती, बोलीभाषेचा ऱ्हास, शहरीकरणामुळे हरवलेली आदिवासी मुल्ये, महिलांच्या आरोग्याचे प्रश्न, राजकीय नेत्यांची खोटी आश्वासने, युवकांची व्यवसनाधिनता, वनकायद्यामुळे आदिवासींवर आलेल्या मर्यादा, पुनर्वसनाचे प्रश्न, कल्याण योजना राबविताना शासकीय अधिकाऱ्यांनी बेपर्वाई, आदिवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वसमाजाकडेच केलेले दुर्लक्ष आदी विषयांवर अजय मसराम यांनी गोंडी गीतांच्या माध्यमातून प्रकाश टाकला. याशिवाय शहीद बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, वरी बाबूराव शेडमाके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व पारीकुपार लिंगो यासारख्या पुरोगामी, परिवर्तनवादी महापुरूषांचे जीवनकार्य गीतांमधून सांगितले. शिक्षण घेऊन आधुनिक विचारांचा स्वीकार करा, मात्र संस्कृती विसरू नका, असे आवाहन मसराम यांनी केले. या प्रबोधन मैफलीला संगीत पुरकाम, रोहित बिसेन, गौरव किरनाके, रमेश युनाती, अरविंद मसराम, गोलू उईके, गजानन उईके, मनीष किरनाके यांनी संगीताची सुमधूर साथ दिली. प्रारंभी आयोजक राजू मडावी यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी नियुक्त झाल्याबद्दल मोहन मसराम व उईके यांचा सत्कार करण्यात आला. आयोजनासाठी वर्धा जिल्हा संयुक्त आदिवासी कृती समितीचे चंद्रभान खंडाते, विजय म्हरस्कोल्हे, अशोक धुर्वे, मोहन मसराम, शंकर म्हरस्कोल्हे, नंदकिशोर बिसेन, राजेंद्र मसराम, द्वारका प्रसाद राऊत, राजेंद्र मडावी, केशव सयाम, केशव पुरके, दादा इवनाते, शंकर उईके, भरत कोवे, संजय कोहचडे, पुंडलिक परतेकी, सुनील सलामे, हरिहर पेंदामकर, सुनील मसराम, अशोक कोडापे, दिगंबर पेंदाम, किसन कौरती, ज्ञानेश्वर उईके, वर्षा टेकाम, गंगाधर उईके, विठ्ठल इवनाथे, सुखदेव आत्राम आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)
गोंडी गीतांनी उजाडली आदिवासी पहाट
By admin | Updated: April 27, 2016 02:23 IST