‘जेथे मनी भाव, तेथे भगवंताचा ठाव’; गाव सीमेपर्यंत दिंडी काढून घोराडवासीयांनी ठेवली परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 03:32 PM2021-06-29T15:32:11+5:302021-06-29T15:35:49+5:30

Wardha News कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही दिंडी नेण्याची परवानगी नसल्याने गावातच वारी पूर्ण करण्याचा संकल्प दिंडी चालक व वारकऱ्यांनी घेतला आहे.

The tradition maintained by the people of Ghorad in Wardha district | ‘जेथे मनी भाव, तेथे भगवंताचा ठाव’; गाव सीमेपर्यंत दिंडी काढून घोराडवासीयांनी ठेवली परंपरा कायम

‘जेथे मनी भाव, तेथे भगवंताचा ठाव’; गाव सीमेपर्यंत दिंडी काढून घोराडवासीयांनी ठेवली परंपरा कायम

Next
ठळक मुद्दे२५ दिवस मंदिर परिकोटाला घालणार प्रदक्षिणा सलग दुसऱ्यांदा वारी प्रतिपंढरीतच

 लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा  : ‘जेथे मनी भाव, तेथे भगवंताचा ठाव’ याप्रमाणे सलग दुसऱ्यांदा प्रति पंढरीतून निघणारी दिंडी गावाच्या सीमेंपर्यंत नेऊन घोराडवासीयांनी परंपरा कायम ठेवली. मात्र, मागील वर्षीप्रमाणे यंदाही २५ दिवस मंदिर परिकोटाला प्रदक्षिणा घालून वारी पूर्ण करण्याचा मानस दिंडीतील भाविकांनी केला आहे.

विदर्भाची प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र घोराड येथून गत १५ वर्षे दिंडी चालक नरेश महाराज पाटील यांच्या नेतृत्वात आळंदी ते पंढरपूरपर्यंत निघणाऱ्या दिंडीत संत केजाजी महाराज पायदळ दिंडी सहभागी होत होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही दिंडी नेण्याची परवानगी नसल्याने गावातच वारी पूर्ण करण्याचा संकल्प दिंडी चालक व वारकऱ्यांनी घेतला आहे. या दिंडीचा प्रारंभ मंगळवारी माता भवानी मंदिरातून करण्यात आला.

टाळ, मृदंगाच्या निनादात ही दिंडी भगव्या पताका घेऊन दरवर्षी या दिंडीत सहभागी होणारे वारकरी मंदिर परिसरात एकत्रित आले. रामकृष्ण हरीचा गजर करीत ज्ञानबा तुकाराम, असा अभंग म्हणत वारकरी विठुमाउलीचे दर्शनाची असलेली आस ही प्रति पंढरीतच पूर्ण करावी लागणार असल्याने भवानी मंदिरातून गावाच्या प्रमुख मार्गाने निघून ग्रामपंचायतीनंतर हिंगणी, सेलू मार्गाने विकास चौकानजीकच्या तेलरांधे यांच्या घरी पोहोचली. बुधवारी ३० रोजीपासून ते २४ जुलै आषाढ पौर्णिमेपर्यंत ही दिंडी विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या परिकोटाला प्रदक्षिणा घालून वारी पूर्ण केल्याचा आनंद वारकरी घेणार आहेत. आळंदी ते पंढरपूर हा २२ दिवसांचा असलेला पायदळ प्रवास असल्याने तोच दिवस घेऊन मंगळवारी ही दिंडी काढण्यात आली. आपली सेवा माउलीच्या चरणी अर्पण व्हावी, असा मानस वारकऱ्यांचा आहे.

 

तोच उत्साह अन् तोच आनंद

वारकऱ्यांची व ग्रामस्थांची विठ्ठल भक्ती पाहता मंगळवारी निघालेली दिंडी ही वारीची आठवण करून देणारी ठरली. गावाच्या सीमेपर्यंत का होईना, पण तीच भक्ती अन् तोच आनंद पाहता गावात भक्तिमय वातावरणात भक्तिरसाचा आनंद घेण्यासाठी व दिंडीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी आपल्या दारासमोर उभे राहून दिंडीचे जल्लोषात स्वागत केले.

प्रदक्षिणा घालून वारी करणार पूर्ण

प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या घोराडातून संत केजाजी महाराज पायदळ दिंडीचे हे १७ वे वर्ष आहे. या दिंडीचे चालक नरेश महाराज पाटील आहेत. ही दिंडी घोराडवरून आळंदीपर्यंत बसने प्रवास करीत व तेथून पायदळ दिंडीत सहभागी होतात. सलग दुसऱ्यांदा आलेले बंधन पाहता व विठ्ठल भक्तीची असलेली आस पाहता २२ दिवसांचा असणारा हा पायदळ प्रवास आपले गावच प्रति पंढरी असल्याने २२ दिवस व पौर्णिमेपर्यंत एकूण २५ दिवस मंदिर परिसरातून गरुड मंदिर, बोर गंगेचा तीर, पुंडलिक मंदिर, संत नामदेव महाराज समाधी, गो माता मंदिराला प्रदक्षिणा घालून वारी पूर्ण करणार आहे. सामाजिक अंतर, मास्कचा वापर वारकरी करणार आहेत. यावेळी दिंडीचे विणेकरी बबन महाराज माहुरे, पुरुषोत्तम महाराज गुजरकर, रामदास मुडे, केशव तडस, विठोबा तडस, रामभाऊ झाडे आदी मंडळी दिंडीत सहभागी आहे.

Web Title: The tradition maintained by the people of Ghorad in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.