शहरात दहशत : ८० हजारांचा ऐवज लंपासदेवळी : येथील आठवडी बाजारातील तीन दुकाने एकाच रात्री फोडली. यात अज्ञात चोरट्यांनी मोबाईल शॉप व किराणा दुकानातील ८५ हजारांचा माल लंपास केला. या परिसरातील दोन मोबाईल शॉप, व एक किराणा अशा तीन दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानातील शटर्सना लोखंडी सळाखांनी वाकवून कुलूपे तोडत चोरी करण्यात आली. चोरीचा सगळ्यात जास्त फटका मोबाईल शॉपीला बसला. ही घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. येथील मोबाईल दुकानातील विविध कंपनीचे ५० हजाराचे ३७ मोबाईल, तसेकच विविध कंपनीचे १० हजाराचे रिचार्ज व्हाऊचर, ३ हजार ९०० रुपयांची रोकड असा मुद्देमाल लंपास केला. या भागात रात्रीच्या काळात वर्दळ कमी राहत असल्याने चोरट्यांनी याचा फायदा घेतला. या प्रकरणी राजिक निसार शेख यांच्या तक्रारीवरून देवळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. याआधी सुद्धा शहराच्या मुख्य भागातील ६ ते ७ दुकाने फोडण्यात आली. याप्रकरणी लवकरच अज्ञात चोरट्यांपर्यंत पोहोचत असल्याचे देवळी पोलिसांनी सांगितले होते. या घटनेला काही महिन्याचा कालावधी झाला. परंतु आजपावेतो त्या प्रकरणातील चोरटे देवळी पोलिसांना गवसले नाही. नव्याने ही दुकाने फोडण्यात आली. यातील चोरटेही असेच मोकळे राहणार काय, असा सवाल करण्यात येत आहे. यावर आळा घालण्याकरिता पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)
एकाच रात्री तीन दुकाने फोडली
By admin | Updated: May 18, 2016 02:12 IST