म्युकरमायकोसिसग्रस्तांसाठी म. फुले जनआरोग्य योजना ठरली ‘संजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 05:00 AM2021-06-23T05:00:00+5:302021-06-23T05:00:12+5:30

वर्धा जिल्ह्यात सुमारे १०० रुग्णांवर या योजनेतून लाखो रुपयांचे उपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ११९ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योजनेअंतर्गत आतापर्यंत असंख्य रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, बरे होऊन ते घरीही गेले आहेत.

For those with myocardial infarction. Phule Janaarogya Yojana becomes 'Sanjeevani' | म्युकरमायकोसिसग्रस्तांसाठी म. फुले जनआरोग्य योजना ठरली ‘संजीवनी’

म्युकरमायकोसिसग्रस्तांसाठी म. फुले जनआरोग्य योजना ठरली ‘संजीवनी’

Next
ठळक मुद्दे१०० रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार : जिल्ह्यात आतापर्यंत आढळले ११९ रुग्ण

सुहास घनोकार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :  कोरोना संसर्गानंतर  बुरशीजन्य म्युकरमायकोसिस झाल्याचे कळताच रुग्णाच्या नातेवाइकांना येणाऱ्या खर्चामुळे अक्षरश: धडकी भरते. म्युकरमायकोसिस आजार जडलेल्या रुग्णाचा खर्च पाच लाखांपासून १५ लाखांपर्यंत असू शकतो. कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना रोजगार गमवावा लागला. वेतनकपातीला सामोरे जावे लागले. व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. अशा परिस्थितीत उपचाराकरिता पैसा कोठून आणायचा, असा यक्ष प्रश्न सर्वसामान्यांपुढे उभा ठाकला असतानाच या रुग्णांसाठी राज्य शासनाची ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ नवसंजीवनी ठरली आहे.
वर्धा जिल्ह्यात सुमारे १०० रुग्णांवर या योजनेतून लाखो रुपयांचे उपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ११९ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योजनेअंतर्गत आतापर्यंत असंख्य रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, बरे होऊन ते घरीही गेले आहेत. सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे १०५ रुग्ण दाखल झाले. यातील ८७ रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत उपचारांचा लाभ देण्यात आला, तर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात आतापावेतो १४ रुग्ण दाखल झालेत. यातील बारा रुग्णांवर योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यात आले असल्याची माहिती महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. स्मिता हिवरे यांनी दिली. 
केवळ वर्ध्यातीलच नव्हे, तर  म्युकरमायकोसिसच्या राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात राहणारा रुग्ण असो, त्याच्यावर वर्ध्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यासाठी केवळ रुग्णाला ही योजना असलेल्या रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे. तसेच केवळ रेशनकार्ड (शिधापत्रिका) मग ते कोणतेही असो, अगदी शुभ्र (पांढरी) असली तरी व ओळख पटविण्यासाठी एक ओळखपत्र, ज्यात आधार कार्ड, वाहन परवाना, बँक पासबुक, मतदान कार्ड, संस्थेचे ओळखपत्र आदींचा समावेश आहे. ही कागदपत्रे संकलित केल्यास रुग्णांना योजनेअंतर्गत मोफत उपचार दिले जातात.

सावंगीतील ८७, तर सेवाग्रामातील १२ रुग्णांना लाभ
म्युकरमायकोसिस या आजाराच्या रुग्णांवर जिल्ह्यातील सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय तसेच सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार केले जातात. या दोन्ही रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जाते.  योजनेंतर्गत सावंगीतील ८७, तर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील बारा रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे शासनाची ही योजना रुग्णांसाठी जीवनदायिनीच ठरली आहे.

आतापर्यंत १०० रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यात आले आहेत. पूर्वी शुभ्र शिधापत्रिकाधारकांचा या योजनेत समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, कोरोनामुक्त  झालेल्यांना म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराचा धोका वाढत असल्याने शुभ्र शिधापत्रिकाधारकांनाही आता या योजनेचा लाभ मिळवून दिला जात आहे. रुग्णांवर राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार होत झाल्याने नातेवाइकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
-डॉ. स्मिता हिवरे, जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जनआरोग्य योजना, वर्धा.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने निर्माण केलेल्या आव्हानांना सामोरे जात असतानाच नव्याने बळावलेल्या म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) या गंभीर आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांचा विशेष वॉर्ड कार्यान्वित करण्यात आला आहे. या आजाराच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णत: मोफत उपचार रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत केले जात असल्याने रुग्णांसह नातेवाइकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-डॉ. चंद्रशेखर महाकाळकर,                                                                  मुख्य वैद्यकीय अधीक्षक, एव्हीबीआरएच, सावंगी (मेघे). 

 

Web Title: For those with myocardial infarction. Phule Janaarogya Yojana becomes 'Sanjeevani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.