शहरात भीती : रात्री पोलिसांची नाही तर नागरिकांची गस्तवर्धा : शहरात सध्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. केवळ रात्रीच नाही तर भर दिवसाही चोऱ्या होवू लागल्या आहेत. यामुळे नागरिकांत चांगलीच दहशत पसरली आहे. यात शहरात रात्रीच्यावेळी विविध भागात खास करून शहरालगत असलेल्या पिपरी (मेघे), सिंदी (मेघे) कारला या भागात चोर आल्याच्या अफवेने चांगलीच धूम केली आहे. यात रात्री पर्यंत संपूर्ण परिसरात नागरिकांची चोर आला... चोर गेला... म्हणत पळापळ सुरू आहे. यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गत महिनाभरापासून शहरात चोऱ्यांच्या घटनांनी चांगलाच उधम माजला आहे. एकाच रात्री नऊ घरफोड्या झाल्याच्या घटनेपासून शहरात व शहरालगतच्या परिसरात चोरट्यांची दहशत कायम झाली आहे. या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नसताना सिंदी (मेघे) परिसरात येत असलेल्या देहनकर ले-आऊट येथे भर दिवसा सकाळी १० वाजताच्या सुमारास चोरट्यांनी महिला घरी एकटी असल्याचे पाहून तिला बांधून तिच्या घरी चोरी केली. यामुळे नागरिकांत चांगलीच दहशत पसरली. चोरी त्या परिसरात रात्रीला पोलिसांची गस्त असल्याचे सांगण्यात आले. रात्री गस्त आटोपून पोलीस पाठमोरे होताच चोरट्यांनी सकाळी हात साफ केला. यामुळे पोलिसांचा या चोरट्यांवर काहीच वचक नसल्याची चर्चा आहे. या घटनेने शहरवासीयात चांगलीच दहशत पसरली असताना शुक्रवारी सायंकाळी स्वागत कॉलनीत रात्री ८ वाजताच्या सुमारास एक इसम एका घराच्या छतावरून दुसऱ्या छतावर जाताना दिसला. यामुळे नागरिकांनी चोर आला.. चोर आला.. म्हणून आरडा ओरड सुरू केली. ही आरडा ओरड रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच तपासाच्या नावावर केवळ दुचाकीने दोन पोलीस आले. तेही वरवर पाहणी करून निघून गेले. मात्र भयभीत झालेल्या नागरिकांनी हातात लाठ्या काठ्या घेवून जागली केली. याच रात्री परिसरातील काही नागरिकांनी हनुमान टेकडीच्या परिसरात हातात टॉर्च घेवून झडती घेतली. मात्र त्यांच्या हाती काहीच आले नसले तरी त्यांच्या मनातील भीती मात्र कायम आहे. पोलीस चोर पकडण्याच्या प्रत्नात असल्याचे सांगत आहेत. मात्र त्यांच्या हाती तो येत नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत पोलीस या चोरट्यांना जेरबंद करीत नाही तोपर्यंत नागरिकांच्या मनात तयार झालेली भीती जाणे शक्य नसल्याची चर्चा आहे. अशातच रात्री एखाद्या सभ्य व्यक्तीलाही मार खाण्याची वेळ येण्याची शक्यता नाकरता येत नाही. पोलिसांकडून चोर पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्रीला गस्तही वाढली आहे. शिवाय नागरिकांनी लाठ्या काठ्या घेवून रस्त्यावर येणे टाळावे असे पोलीस विभागाकडून कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
चोर आला आला.. गेला गेला..
By admin | Updated: November 16, 2014 23:09 IST