लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात पाण्याची चळवळ उभी करणारे पाणी फाऊंडेशन यावर्षी वॉटर कप स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू करीत आहे. पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या आणि पाणीदार झालेल्या गावांसाठी ही स्पर्धा असून यात पाण्याचा विवेकी वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण देऊन त्यावर ‘समृद्ध गाव’ अशी स्पर्धा घेण्यात येईल. वर्धा जिल्ह्यातील २८ गावांचा या स्पर्धेत सहभाग राहणार असून स्पर्धेच्या कालावधीत ते ‘समृद्ध’कडे वाटचाल करणार आहेत, अशी माहिती पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी फाऊंडेशनच्या यावर्षीच्या स्पर्धेबाबतचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. यावेळी डॉ. पोळ बोलत होते. याप्रसंगी जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओम्बासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, जलसंधारण अधिकारी गेहलोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनील इंगळे तसेच पाणी फाऊंडेशनचे वर्धा येथील प्रतिनिधी उपस्थित होते.डॉ. पोळ पुढे म्हणाले, राज्यातल्या ४० तालुक्यातील १ हजार १०० गावांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. यात शालेय विद्यार्थ्यांसाठी निसर्गाची शाळा हा उपक्रम असेल. यामध्ये शालेय मुलांवर लहानपणीच निसर्गाबद्दलचे संस्कार रुजविणे, त्यांच्यामध्ये निसर्गाप्रती ओढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच गाव शिवारातील गवत, जंगल आणि मातीचा सेंद्रीय कर्ब वाढविणे, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून पीक घेणे, निसर्गाचे संवर्धन करून गावातील माणसाला समृद्ध करणे असा या स्पर्धेचा उद्देश असून स्पर्धा ५०० गुणांची राहणार आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील २८ गावांचा समावेश यात करण्यात आला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात पाणी आणि पर्यवारणाबद्दल चांगली जागृती आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात यासाठी चांगला सहभाग मिळेल. तसेच या गावांमध्ये सामूहिक प्रयत्नातून प्राधान्यक्रमाने शासनाच्या योजना राबवता येईल. गाव पातळीवर प्रेरणादायी शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. योग्य काम झाल्यास उद्देश साध्य होईल, असे जिल्हाधिकारी भिमनवार म्हणाले.
आर्वी तालुक्यातील २८ पाणीदार गावे होणार समृद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST
जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी फाऊंडेशनच्या यावर्षीच्या स्पर्धेबाबतचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. यावेळी डॉ. पोळ बोलत होते. याप्रसंगी जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओम्बासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, जलसंधारण अधिकारी गेहलोत, .....
आर्वी तालुक्यातील २८ पाणीदार गावे होणार समृद्ध
ठळक मुद्देअविनाश पोळ : वॉटर कप स्पर्धेचा दुसरा टप्पा; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक