लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक ३५३ (१) (वाडी-आसोला-सेलडोह-पवनार) या मार्गाकरिता कुटकी येथील जमिनींचे संपादन करण्यात आले. आता हा मार्गही पूर्णत्वास गेला असून अद्यापही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. शेतकरी आठ वर्षांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत असून तातडीने शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी अशोक झाडे यांच्यासह इतरही शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्याकडे केली आहे.
शेतकरी झिजविताहेत कार्यालयाचे उंबरठेकुटकी येथील शेतकरी जमिनीचा मोबदला मिळावा, याकरिता शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन मोबदला देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांनी शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागवून कार्यवाही सुरू केली होती.
मंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाई झालीच नाहीहा प्रश्न नामदार नितीन गडकरी यांच्याकडे गेला होता. त्यांनी मोबदला देण्याच्या सूचनाही केल्या होत्या. त्या संर्भात प्रस्ताव सादर करून आता चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही त्यावर काही कार्यवाही झाली नसल्याने शेतकऱ्यांची अडचण कायम आहे म्हणून पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोबदला देण्याची मागणी केली आहे.