वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील ढिवरी-पिपरी येथील १२.३० वाजता हिंगणघाट येथून सुटणारी बसफेरी अचानक बंद करण्यात आली. यामुळे संतप्त विद्यार्थिनींनी बुधवारी सकाळी सुमारे तीन तास बसरोको आंदोलन केले. निवेदन देण्यास गेल्यानंतर ते न स्वीकारता परत पाठविणाऱ्या आगार व्यवस्थापकास अखेर आंदोलनस्थळी यावे लागले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. हिंगणघाट आगारातून विद्यार्थी व प्रवाशांसाठी १२.३० वाजता धानोरा मार्गे ढिवरी-पिपरी बस सोडली जाते; पण आगर व्यवस्थापकाने ती काही महिन्यांपूर्वी बंद केली. यामुळे सकाळी ६.३० वाजता उच्च शिक्षण घेण्यासाठी हिंगणघाट, वडनेर येथे गेलेल्या विद्यार्थ्यांना सायंकाळपर्यंत ताटकळावे लागते. यातच दोन-तीन मुलींची तब्बेत बिघडल्याने पालक संतप्त होते. प्रथम विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापकास निवेदन दिले; पण व्यवस्थापकाने दुर्लक्ष केले. यामुळे आंदोलन करण्यात आले. रात्रपाळीची बस क्र. एमएच ४०/८६८२, सकाळी ९ वाजता आलेली धानोरा मार्गे एमएच १४ बीटी ०८६१ व बोपापूर पोहणा मार्गे १० वाजताची एमएच २० डी ९१४३ बस ढिवरी-पिपरी येथील पालक व विद्यार्थिनींनी रोखली. आगार व्यवस्थापक येत नाही व बसफेरी पूर्ववत करीत नाही, तोपर्यंत बसेस सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर वडनेरचे ठाणेदार जयस्वाल व आगार व्यवस्थापक मेश्राम यांनी घटनास्थळी येऊन बसफेरी पूर्वरत करण्याची ग्वाही दिल्यानंतर बसेस सोडण्यात आल्या. यात अशोक भोसले, शरद राऊत, विलास भोयर, पालक व विद्यार्थी सहभागी झाले.(कार्यालय प्रतिनिधी)
ढिवरी-पिपरी फेरी बंद केल्याने विद्यार्थ्यांचा बसरोको
By admin | Updated: August 26, 2016 02:06 IST