पुनर्वसनाचे भिजत घोंगडे : नागरी सुविधांपासूनही नागरिक वंचितआर्वी : निम्न वर्धा प्रकल्पासाठी जिल्ह्यातील २३ गावांच्या जमिनी घेण्यात आल्या. यामुळे त्या गावांचे पुनर्वसन करण्यात आले; पण सदर ग्रामस्थांना मुलभूत सुविधाच पुरविण्यात आल्या नाहीत. यामुळे पुनर्वसनाचे भिजत घोंगडे कायम आहे. सर्कसपूरसह तालुक्यात अनेक प्रकल्पबाधित गावे आहेत. प्रकल्पग्रस्त नागरिकांनी सुविधांसाठी अनेकदा आंदोलने केली; पण उपयोग झाला नाही. शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देत प्रकल्पग्रस्तांची फरफट थांबविणे गरजेचे झाले आहे.तालुक्यातील सर्कसपूर या गावात नागरी सुविधा पुरवाव्या, गावातील अन्य सुविधा त्वरित द्याव्या या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषण केले होते. संबंधित विभागाने माजी आमदार दादाराव केचे यांच्या मध्यस्थीनंतर सात दिवसांच्या आत समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देत आंदोलन थांबविले होते; पण अद्यापही गावात नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. गावातील समस्या सोडवाव्या, नागरी सुविधा पुरवाव्या, रस्ते, वीज, नाल्या, पाणी या मुलभूत सुविधांची पुर्तता करावी या मागण्यांसाठी अनेकदा निवेदने दिली; पण संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता; पण युवकांचे वय निघून जात असताना त्यांना नोकऱ्या देण्यात आल्या नाही. प्रकल्पग्रस्तांच्या वयोमर्यादेचा शासन निर्णय फेब्रुवारी २००७ मध्ये काढला. अद्याप त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. सर्कसपूर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सर्कसपूर पुनर्वसन गावात प्लॉट व शासकीय जागेत घाणीचे साम्राज्य आहे. स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी पोचरस्ता नाही. शेडची अत्यंत दुरवस्था झाली आहे. शाळा, समाज मंदिर परिसराची डागडुजी करण्यात आलेली नाही. प्रवासी निवारा दुरवस्थेत असून ग्रामपंचायतची कामेही खोळंबलेली आहेत. गावात बाजार भरत नसल्याने मार्केट ओटे रद्द करून त्या निधीचा वापर ग्रामस्थांसाठी करणे गरजेचे होते; पण त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचेच दिसून येत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याकरिता व्यवस्था नाही. उदरनिर्वाह भत्ताही देण्यात आलेला नाही. न्यायालयातील प्रकरणे व्हीआयडीने मागे घ्यावी, ही मागणीही धूळखात आहे. सर्कसपूर व अहिरवाडा येथील घर बांधकामासाठी वर्धा व बाकळी नदीतून रेती काढण्याची मुभा देण्यात यावी व अन्य मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. या समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी सर्कसपूर येथील प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे. पुनर्वसन ठिकाणी अकरा नागरी सुविधा त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित विभागाने दिले होते; पण त्या समस्या अद्याप सुटलेल्या नाही. यासाठी फेबु्रवारी महिन्यात टाकीवर चढून आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता. यानंतर तरी कार्यवाही होईल, अशी अपेक्षा होती; पण प्रशासनाने हालचालच न केल्याने प्रकल्पग्रस्तांची फरफट कायम आहे.(तालुका प्रतिनिधी)उदरनिर्वाह भत्ता बंद; ग्रामस्थ अडचणीतप्रकल्पग्रस्त नागरिकांना सर्व मुलभूत सुविधा पुरविणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे पुनर्वसित गावांचे भिजत घोंगडे आजही कायम आहे. सर्कसपूर येथील ग्रामस्थांना नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. प्रकल्पग्रस्त युवकांना नोकऱ्याही देण्यात आलेल्या नाही. शिवाय उदरनिर्वाह करताना अडचणी जाऊ नये म्हणून शासनाकडून मिळणारा उदरनिर्वाह भत्ताही गत काही महिन्यांपासून बंद आहे. या प्रकारामुळे प्रकल्पग्रस्त नागरिक त्रस्त झाले आहेत. सर्कसपूर येथील ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसले; पण उपयोग झाला नाही. यासारखी अनेक गावे तालुक्यात असून प्रकल्पग्रस्तांना न्याय देणे गरजेचे झाले आहे.
प्रकल्पग्रस्तांची फरफट थांबेना
By admin | Updated: April 29, 2016 02:03 IST