कपाशी ८८ टक्क्यांवर : ६० टक्के दुबार पेरणीवर्धा: पावसाच्या प्रतीक्षेत रखडलेल्या पेरण्यांना जोर आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ५५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यात कपाशीची ८८ टक्के लागवड झाली आहे तर सोयाबीनचा पेरा केवळ ३१ टक्केच झाला आहे. जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर खरीपाच्या पेऱ्याचा आराखडा कृषी विभागाच्यावतीने करण्यात आला होता. १ लाख ८२ हजार हेक्टरवर कापूस तर १ लाख ६९ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार होता. उर्वरीत क्षेत्रात इतर पिकाचे नियोजन होते; मात्र पाऊस उशिरा आल्याने कृषी विभागासह शेतकऱ्यांचेही नियोजन बिघडले. अनेकांनी पावसाच्या प्रतीक्षेत पेरण्या आटोपल्या; मात्र त्या उगविल्या नाही. यामुळे त्यांना मोड आली. सोयाबीनच्या बियाण्यांच्या वाढलेल्या किमती व पावसाची दडी यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा करण्याचे टाळले. गत सोमवारपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. या पावसानंतर जिल्ह्यात सोयाबीनच्या पेऱ्याला सुरुवात झाली. यात आजपर्यंत जिल्ह्यात ५१ हजार ८७६ हेक्टरवरच सोयाबीनचा पेरा झाला आहे. हा पेरा वाढण्याची शक्यता कृषी विभागाच्यावतीने वर्तविली जात असली तरी वेळ गेल्याने हा पेरा वाढणार नसल्याचे बोलले जात आहे. कपाशीची लागवड १ लाख ६१ हजार ५७६ हेक्टरवर झाली आहे. कृषी विभागाने नियोजित केलेल्या पेऱ्याच्या जवळपास तो पोहोचला आहे. असे असले तरी ६० टक्के लागवड दुबार पेरणीचीच असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत तुरीचा पेरा २९ हजार ८१२ हेक्टरवर आहे. यातही वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्यावतीने वर्तविली जात आहे. जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या खरीपाच्या पेऱ्यात पाऊस उशिरा आल्याने घट होण्याची चिन्हे आहेत. यामुळे २५ टक्के जमीण पडिक राहणार असल्याचे बोलले जात आहे. जमिनी पडिक राहण्यापेक्षा शेतकऱ्यांनी इतर पिकांचे नियोजन करावे असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. यात पेरणी करताना शेतकऱ्यांनी परंपरागत पद्धतीचा वापर न करता नव्या पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना कृषी विभागाच्यावतीने करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
सोयाबीनचा पेरा केवळ ३१ टक्के
By admin | Updated: July 21, 2014 23:59 IST