लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अस्मानी व सुल्तानी संकटांचा सामना यंदाही देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरातील शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. या परिसरात सोयाबीन पिकावर सध्या खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.देवळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा कपाशी व तूर पिकाला फाटा देत सोयाबीन पिकाची लागव केली. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पेरणीच्या कामाला गती मिळाली. वेळोवेळी योग्य निगा घेतल्याने सोयाबीन पिकांची वाढही बऱ्यापैकी झाली; पण अशातच सध्या सोयाबीन पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरात सदर रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. खोडकिडीच्या प्रादुर्भावातून सोयाबीन पीक कसे वाचविता येईल यासाठी सध्या शेतकरी प्रयत्नही करीत आहेत. मात्र, पाहिजे तसे यश त्यांना येत नसल्याचे शेतकरी सांगतात. विजयगोपाल भागातील विश्वेश्वर अवसरे, अभिलाश ढांगे, विजय पेटकर, राहूल पेटकर, मयुर अवसरे या शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या सोयाबीन पिकावर सध्या खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. खोडकिडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच तो दूर सारण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी या भागातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आहे.दोन शेतकऱ्यांनी मोडले पीकखोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे विजयगोपाल परिसरातील दोन शेतकऱ्यांची उभे सोयाबीन पीक मोडले आहे. वसंत रंधये व सतीश पेठे या शेतकऱ्यांनी लागवड केलेले सोयाबीन पीक खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे मुळासकट उपटल्याचे सांगण्यात येते. त्यांना यंदा खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसानच सहन करावे लागल्याने त्यांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरऱ्यांची आहे.उत्पादनात घट येण्याची भीतीखोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सदर रोगाच्या प्रादुर्भावामुळे उभे पीक करपल्यागत होत असल्याने यंदा उत्पादनात घट येण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:46 IST
अस्मानी व सुल्तानी संकटांचा सामना यंदाही देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरातील शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. या परिसरात सोयाबीन पिकावर सध्या खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव
ठळक मुद्देशेतकऱ्यांची वाढली चिंता : कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज