सेवाग्राम : सोयाबीनने कंबरडे मोडले़ भिस्त आता कपासीवर आहे. पण एक दोन वेच्यातच उलंगवाडी होण्याची स्थिती असल्याने शेतकरी वर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे़ येणारा हंगाम शेतकऱ्यांच्या हिताचा असावा अशी अपेक्षा शेतकरी व्हक्त करीत आहे. सातत्याने शेतकऱ्यांची लुबाडणूक, दिशाभूल होत आली आहे़ त्याच अवस्थेत नव्हे तर त्यांचे खच्चीकरण कसे करता येईल हेच धोरण शासनाने राबविले आहे़ सध्यातरी शेतकरी सोयाबीन सवंगणी व काढण्याच्या कामात व्यस्त असून सामान्यपाणे एकरी एक ते तीन पोते असा सर्वत्र उतारा आहे़ ठराविकच शेतकऱ्यांना चार ते पाच पोत्यांचा उतारा आहे़ मात्र दाना बारिक असल्याने किती भाव मिळणार असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे.दिवाळी अगोदर निघणारे सोयाबीन यावेळी पावसामुळे दिवाळीनंतर काढण्यात येत आहे़ सेवाग्राम ते हमदापूर तसेच आलगाव, बोंडसुला आदी गावात सोयाबीनचे उत्पन्न पाच टक्के असल्याने सोयाबीन उत्पादक पूर्णत: बुडाला आहे़ याच गावातील काही शेतकऱ्यांनी न सवंगण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली़ सोयाबीन सारखीच कपाशीची अवस्था आहे़ कोरडवाहूमध्ये अडीच ते तीन क्विंटल आणि ओलिताचा पाच ते सहा क्विंटल असे एकरी उत्पादन राहणार आहे़ पण लाल्याचा प्रकोप आल्याने यावर सुद्धा संक्रात आली आहे़ पऱ्हाटीला थंडी व पाण्याची गरज आहे़ दोन्ही प्रमाण कमी असल्याने रोग वाढत आहे. यामुळे फारच कमी वेचे होणार असे दिसत आहे. निसर्गाच्या भरोश्यावर आणि आशेवर जगणारा शेतकरी चना वा गव्हाची पेरणी करून काही पदरात पाडण्याची तयारी करीत आहे़ कर्ज व उसनवारी फेडायची की जगायचे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे़ शेतकऱ्यांना होणारे उत्पन्न पाहता बँकेचे लोन सुद्धा यावर्षी फेडू शकणार नाही, अशा परिस्थितीत शेतकरी आहे़ महागाई वाढत आहे़ मजुरीपासून तर बियाणे आणि शेतमाल काढण्यापर्यंत हिशोब भोवळ आणणारा असाच आहे़ ग्रामीण क्षेत्र व जीवन शेतीवर असल्याने चिंताजनक वातावरण दिसत आहे़(वार्ताहर)
सोयाबीनने मोडले कंबरडे, कपाशीवर भिस्त
By admin | Updated: November 9, 2014 23:18 IST