साहेब, आता ऑक्सिजन बेड उपलब्ध होईल का? सांगा ना, त्यांना धाप लागलीय, ते खूप तडफडताहेत हो..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 05:00 AM2021-04-22T05:00:00+5:302021-04-22T05:00:14+5:30

कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन सुरुवातीपासून अ‍ॅक्शन मोडवर कार्यरत आहे. पण, नागरिकांचा बेजबाबदारपणा कोरोना संसर्ग वाढविण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालयातील बऱ्याचशा खाटा बाहेरजिल्ह्यातील रुग्णांनी व्यापल्या आहेत. जिल्ह्यात दररोज चारशे ते पाचशे रुग्ण आढळून येत असल्याने त्यांना उपचाराकरिता धावाधाव करावी लागत आहे.

Sir, will the oxygen bed be available now? Tell me, they are out of breath, they are suffering a lot ..! | साहेब, आता ऑक्सिजन बेड उपलब्ध होईल का? सांगा ना, त्यांना धाप लागलीय, ते खूप तडफडताहेत हो..!

साहेब, आता ऑक्सिजन बेड उपलब्ध होईल का? सांगा ना, त्यांना धाप लागलीय, ते खूप तडफडताहेत हो..!

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील परिस्थिती : कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने वाढली धास्ती

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्गासोबतच मृत्युसंख्याही वाढायला लागली आहे. परिणामी ‘रुग्णालयात बेड नाही अन् स्मशानात अंत्यविधीला शेड नाही’ अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटकाळात कोरोनाशी लढा देण्याकरिता आणि नागरिकांना योग्य माहिती पुरविण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम (हेल्पलाईन सेंटर) सुरू आहेत. येथील फोन चोवीस तास खणखणत असून, ‘साहेब, आता ऑक्सिजन बेड मिळेल का? त्यांना धाप लागलीय, ते तडफडताहेत हो...!’ अशी विनवणी केली जात आहे. त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न या सेंटरकडून होत आहे.
कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन सुरुवातीपासून अ‍ॅक्शन मोडवर कार्यरत आहे. पण, नागरिकांचा बेजबाबदारपणा कोरोना संसर्ग वाढविण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालयातील बऱ्याचशा खाटा बाहेरजिल्ह्यातील रुग्णांनी व्यापल्या आहेत. जिल्ह्यात दररोज चारशे ते पाचशे रुग्ण आढळून येत असल्याने त्यांना उपचाराकरिता धावाधाव करावी लागत आहे. दोन्ही रुग्णालये हाऊसफुल्ल झाली असून, रुग्णांचे नातेवाईक आता वॉर रूम (हेल्पलाईन सेंटर) मध्ये फोन करून रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत, याची माहिती विचारण्यासह रुग्णाला काही अडचणी येत असतील, तर त्यांची माहितीही ते वॉर रूमला देत आहे. माहिती देण्यापेक्षा उपलब्ध खाटांची माहिती विचारणारेच फोन अधिक असल्याने वॉर रूममधील कर्मचारी ऑनलाईन स्टेटस पाहून त्यांना तात्काळ रुग्णालयातील खाटांची माहिती देत आहे. आता वर्धा नगरपालिकेनेही रुग्णांना तसेच नातेवाइकांना योग्य माहिती देण्याकरिता वॉर रूम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहेत. इतकेच नव्हे तर गृहअलगीकरणात असलेल्या ॲक्टिव्ह कोविड बाधिताच्या शरिरातील ऑक्सिजनची तपासणी तसेच त्यांना वेळीच भ्रमणध्वनीवर वैद्यकीय सल्ला मिळावा म्हणूनही विशेष प्रयत्न केले जात आहे.  

सहा जणांची वॉर रुम 

 कोरोनाशी लढा देण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम तयार करण्यात आली असून, त्या ठिकाणी सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चोवीस तास कामकाज चालत असून, दोन-दोन कर्मचारी तीन पाळीत कार्य करीत असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

 रुग्ण किंवा रुग्णाच्या नातेवाइकांकडून सकाळपासून रात्रीपर्यंत सतत फोन खणखणत असतात. दिवसभरात ५० पेक्षा अधिक फोन येत असून, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी कर्मचाऱ्यांना रुग्णांच्या नातेवाइकांच्या रोषाचाही सामना करावा लागतो.

कोरोनाकाळात उपलब्ध सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम तयार करण्यात आली असून, तीन पाळीमध्ये सहा कर्मचारी कार्यरत आहेत. आलेल्या फोनची नोंद एका रजिस्टरमध्ये केली जाते. नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.
महेंद्र सूर्यवंशी, अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा

कोणाला ऑक्सिजन हवा, तर कोणाला रेमडिसीविर इंजेक्शन
कोरोना लाटेतील रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होण्याचे प्रमाण वाढल्याने रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी झाली की, त्याला रुग्णालयात दाखल करण्याशिवाय पर्याय राहत नाही. अशातच जिल्ह्यातील दोन्ही रुग्णालयांतील ऑक्सिजन बेड फुल्ल असल्याने ते मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. काहींनी वेळीच ऑक्सिजन न मिळाल्याने जगाचा निरोप घेतला आहे. जिल्ह्यात सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात रुग्ण दाखल असल्याशिवाय कुणालाही बाहेरून रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. पण, बरेच रुग्ण पॉझिटिव्ह असल्याने रुग्णालयात न जाता घरीच गृह अलगीकरणात असून, त्यांच्याकरिता रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी होत आहे. सर्व खासगी रुग्णालय व शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसून येत असल्याने वेळीच उपचार मिळविण्यासाठी धडपड वाढली आहे. बरेच रुग्ण कोरोनाच्या भीतीपोटी तपासणी न करता घरीच उपचार घेत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
 

सारेच अपुरे

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केला. चाचण्यांचेही प्रमाण वाढविले आहे. चाचण्या वाढल्याने रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या २७ हजारांच्या उंबरठ्यावर असून, मृत्युसंख्या ५६३ झाली आहे. दररोज चारशेपार रुग्ण आढळून येत असल्याने त्यांना दाखल करून घेण्यासाठी आता रुग्णालयात खाटा नाही. मृत्यू वाढत असल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नाही तसेच यंत्रणेवरही ताण वाढत असून, मनुष्यबळही अपुरे पडण्याची वेळ आली आहे. 

 

Web Title: Sir, will the oxygen bed be available now? Tell me, they are out of breath, they are suffering a lot ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.