प्रशासनात खळबळ : वीज जोडणीकरिता शेतकऱ्याने लढविली शक्कललोकमत विशेषअमोल सोटे आष्टी (शहीद)शेतात वीज जोडणीकरिता तालुक्यातील चिंचोली येथील शेतकऱ्याने त्याच्या वडिलासह नात्यात येत असलेल्या चार मृतकांना जिवंत दाखविल्याचा खळबळजनक प्रकार माहिती अधिकारातून उघड झाला. हा प्रकार इतर अन्य तीन मृतकांच्या परिवारातील सदस्यांनी चव्हाट्यावर आणला. याची माहिती वीज वितरण कंपनीला होताच हा प्रकार करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून त्याच्यावर फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. चिंचोली येथील रामहरी कुरवाडे याने शेतात ओलीत करण्याकरिता शक्कत लढविलेल्या या शेतकऱ्याने शपथपत्र हस्तलिखित करून मृतकांच्या स्वाक्षऱ्या मारून विविध योजनांचा लाभ उचलल्याचीही चर्चा गावात जोरात आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी इतर मृतकांच्या नातलगांनी तक्रारीतून केली आहे. रामहरी कुरवाडे याचे वडील किसन कुरवाडे व लांडगे कुटुंबातील १० अशा एकूण ११ जणांच्या नावे चिंचोली शिवारात शेत सर्व्हे नं. १२१ आहे. त्याची एकूण आराजी १ हेक्टर ५१ आर आहे. किसन कुरवाडे यांचा १ आॅक्टोबर २०१५ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर शेतात सिंचन करण्यासाठी ओलिताची सोय व्हावी म्हणून मुलगा रामहरी याने वीज वितरण कंपनीकडे रितसर अर्ज केला. या अर्जाला आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये १०० रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर नाहरकत असल्याचे शपथपत्र द्यावे लागते. असे शपथपत्र देताना त्याने त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला तरी ते हयात असल्याचे दाखविले. याकरिता त्याने १६ डिसेंबर २०१५ रोजी मुद्रांक शुल्क विक्रेत्याला गाठून वडिलांची तब्येत बरोबर नाही, असे सांगून मुद्रांक शुल्काची खरेदी केली. मुद्रांक शुल्क देताना त्यावर विकत घेणार म्हणून किसन कुरवाडे यांचे नाव टाकले. लिहून देणार म्हणून सुरेश लांडगे, जनाबाई लांडगे, वनमाला लांडगे, सुलोचना कदम, मालती मगर, रेखा काळभोर, विनायक लांडगे, प्रेमीला काळभोर, शीला मगर यांची नाव टाकली. या मुद्रांक शुल्कावर विहिरीवरून ओलिताकरिता पाणीपुरवठा करण्याची हरकत नाही, असे शपथपत्र लिहून सर्वांच्या बनावट स्वाक्षऱ्या मारल्या. यावर साक्षीदार म्हणून दीपक लांडे, शरद वानखडे यांच्याही बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
शपथपत्रावर चार मृतांची स्वाक्षरी
By admin | Updated: May 18, 2016 02:16 IST