संघर्ष जाधव ल्ल केळझरविदर्भातील अष्टाविनायकांपैकी एक असलेले केळझरचे सिद्धीविनायक मंदिर गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात भाविकांच्या अलोट गर्दीने फुलले आहे. या दहा दिवसांत ‘श्री’ चा महाअभिषेक, भजन, पूजन, अखंड विणा नाद, ‘श्री’ची महाआरती करण्यात येत आहे. सिद्धीविनायक मंदिरामध्ये लक्षावधी दिव्यांची आरास करण्यात आली आहे. यामुळे मंदिर उजळून निघाले आहे.मंदिरात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सांगता रविवारी अनंत चतुर्दशीला महाप्रसादाने होणार असल्याचे मंदिराचे अध्यक्ष सुभाष जोगे, सचिव महादेव कापसे यांनी सांगितले. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक केळझरचे ऐतिहासिक सिद्धीविनायक गणपती मंदिर रामायण व महाभारतपूर्व कालीन आहे. वसिष्ठ ऋषींनी त्यांच्या भक्ती व पूजेकरिता या गणपतीची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. याच गावात पांडवांनी बकासूराचा वध केल्याचीही इतिहासात नोंद आहे. येथील गणपती नवसाला पावणारा असल्याची धारणा भाविकांमध्ये असल्याने दररोज मोठ्या संख्येने दर्शनार्थी या ठिकाणी भेट देतात. सदर गणपती मंदिर गावातीलच टेकडीवर असून या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्वही अनन्यसाधारण आहे. वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे जागृत श्री गणपतीचे मंदिर असून ते सर्वदूर परिचित आहे. हे गाव नागपूरवरून ५२ किमी तर वर्धेवरून २६ किमी अंतरावर टेकडीच्या कुशीत वसलेले आहे. मंदिर वर्धा-नागपूर मुख्य मार्गावर अंदाजे एक फर्लांग अंतरावर उत्तरेकडे उंच टेकडीवर आहे. मंदिराचा रस्ता गावातून असून रस्ता दर्शक फलक मुख्य मार्गावर लावण्यात आले आहे.भोसलेकालीन इतिहासात गावाची नोंद४भोसले राजे कोल्हापूरवरून नागपूरला स्थलांतरित होण्यापूर्वी त्यांचा केळझरला मुक्काम झाल्याची नोंद आहे. केळझरस्थित ‘वरद विनायक’ श्री गणपतीची मूर्ती १.४० मिटर (४ फूट ६ इंच) उंच असून तिचा व्यास ४.४० मिटर (१४ फुट) आहे. अत्यंत प्रसन्न मुद्रा, मनमोहक, सजीव (जागृत) मूर्ती असून नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. विदर्भातील ‘अष्टविनायक’मधील एक प्रमुख स्थान आहे. १ सप्टेंबर १९९३ ला या मंदिरात जिर्णोद्धाराच्या कामाला सुरूवात झाली. १९९४ मधील महाशिवरात्रीच्या पूर्वी खोदकामात शिवलिंग मिळाले. त्याचा उल्लेख ‘शिवलीला अमृताच्या’ शेवटच्या अध्यायात एकचक्रनगराला ‘ज्योतिर्लिंग’ असल्याची नोंद आहे. याच गावात जैन पंथाचे आठवे तिर्थनकार ‘चंद्रप्रभू’ स्वामींची सुंदर मूर्ती मिळाली असून ती आठव्या शतकातील असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. महालक्ष्मी व ज्योतिर्लिंग हे दोन्ही पाषाणमूर्ती दोन ते अडीज हजार वर्षांपूर्वीचे असावे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. महाभारतातील उल्लेख४कुंतीपुत्र पांडव एकचक्रनगरात वास्तव्याला असताना बकासूर नावाच्या राक्षसाला ठार केल्याची नोंद आहे. हे ठिकाण वर्धा ते नागपूर मुख्य मार्गावर गावाच्या आग्नेय बाजूला बौद्धविहाराच्या समोर आहे. ते स्थळ बकासूर, तोंड्या राक्षसाचे मैदान म्हणून प्रचलित आहे. गणपतीचे मंदिर असलेली टेकडी निसर्गरम्य असून त्या टेकडीला वाकाटकाच्या काळापासून भव्य किल्ल्याचे ठिकाण होते. त्या किल्ल्याला पाच बुरूज होते व तीन मातीगोट्यांनी बांधलेले भव्य परकोट होते. पहिल्या व दुसऱ्या परकोटाच्या आत चौकोनी सुंदर व भव्य अशी ‘कुशावरती’ विहीर असून ती ‘गणेश कुंड’ या नावाने ओळखली जाते. अनेक भाविक त्यातील पाणी वापरतात. वाकाटकानंतर प्रवर्शन राजाचे हे गाव मुख्यालय असल्याची इतिहासात नोंद आहे.वसिष्ठ पुराणामध्येही नोंद४या गावाचे नाव ‘एकचक्रनगर’ असल्याचा वसिष्ठ पुराण व महाभारतात उल्लेख आहे. वसिष्ठ पुराणाप्रमाणे श्रीरामाचे गुरू वसिष्ठ ऋषी यांचे वास्तव्य येथे झाल्याची नोंद असून त्यांनी भक्ती व पूजेसाठी गणपतीची स्थापना केल्याचा उल्लेख आहे. त्याच काळात वर्धा नदीच्या निर्मितीचा उल्लेख आहे. पुराणाप्रमाणे या गणपतीचे नाव ‘वरद विनायक’ असून वर्धा नदीचे ‘वरदा’ हे नाव होते. हा काळ श्रीरामजन्माचे पूर्वीचा आहे.
लक्षावधी दिव्यांनी उजळले सिद्धीविनायक मंदिर
By admin | Updated: September 22, 2015 03:23 IST