फसवणुकीची फिर्याद : मुलीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखलवर्धा : स्वत:चे खोटे नाव सांगून युवतीने एका डॉक्टर युवकाशी शुभमंगल केले. ज्या मुलीशी आपण विवाह केला तिचे नाव दुसरेच असून तिचे या आधीही एक लग्न झाल्याचे कळताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली शुद्ध फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने वर्धा शहर ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविल्याने हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. डॉ. अमित शंकर कांबळी(३४ )रा. मुल, जि. चंद्रपूर हल्ली मुक्काम सेवाग्राम असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार, वर्धेतील एका युवतीसोबत फेबु्रवारी २०१२ मध्ये अमितचा विवाह झाला. लग्नानंतर काही महिन्यातच आपली पत्नी आपल्याशी काहीतरी लपवित असल्याचे त्याच्या लक्षात आले. या संदर्भात त्याने शोध घेतला असता, तसेच खोदून खोदून तिला विचारले असता तिने ज्यांना आपले आई-वडील सांगितले ते तिचे आई-वडील नसून मावशी व काका होते. तसेच तिची खरी आई ही वडीलासोबत न राहता एका इसमासोबत राहत असल्याचेही सत्य समोर आले. एवढेच नाही, तर या आधी तिचा एका युवकाशी विवाह देखील झाला होता. सोबतच ज्या युवकासोबत तिचा विवाह झाला होता, त्याचेही दुसऱ्या युवतीशी आधीच लग्न झाले होते. तसेच त्या युवतीनेही सदर युवकांवर फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. हा सर्व प्रकार समोर आल्यावर डॉ. अमित थक्कच झाला. यानंतर त्याने वर्धा शहर ठाण्यात सदर युवती व तिच्या नातेवाईकांच्या नावाने तक्रार दाखल केली. याप्रकरणी शहर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध भादंवि कलम ४१९ अन्वये गुन्हा दाखल केला. अधिक तपास सुरू आहे.(शहर प्रतिनिधी)
खोट्या नावाने डॉक्टरशी शुभमंगल
By admin | Updated: January 7, 2015 22:57 IST