लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'शक्तिपीठ महामार्ग' प्रकल्पाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून होणार आहे. पवनार ते पत्रादेवी अशा ८०२ किलोमीटरच्या या मार्गासाठी वर्धा जिल्ह्याच्या २० गावांतील ५०३ हेक्टर जमीन संपादित होणार आहे.
या जमिनीचे मोजमाप भूमी अभिलेख विभागाने पूर्ण केले आहे. या महामार्गामुळे राज्यातील महत्त्वाची शक्तिपीठे आणि तीर्थस्थळे जोडली जाणार आहेत. यात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुकामाता, अंबाजोगाईची योगेश्वरी माता आदी शक्तिपीठे, तसेच परळी वैजनाथ, औंढा नागनाथासह इतर तीर्थस्थळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २० गावांतून हा महामार्ग जाणार आहे. भूमिअभिलेखाने २० गावांतील जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता भूसंपादनाची प्रतीक्षा आहे.
महाराष्ट्र शक्तिपीठ एक्स्प्रेस हायवे क्रमांक १०
- महाराष्ट्र शक्तिपीठ एक्सप्रेस हायवे क्रमांक १० या नावाने हा महामार्ग ओळखला जाणार आहे. हा मार्ग प्रत्यक्षात जिल्ह्यातील दिग्रज येथून सुरू होणार आहे.
- तालुक्यांतील दिग्रज, वर्धा आणि देवळी पांढरकवडा, गणेशपूर, झाडगाव, तिगाव, रोठा, धोत्रा (रेल्वे), चिकणी, पढेगाव, निमगाव, देवळी, इसापूर, काजळसरा, वाटखेडा, बाभूळगाव (खोसे), सैदापूर, वाबगाव, खर्डा, करमाळापूर, कासीमपूर या गावांजवळून हा महामार्ग जाणार आहे.