बियाण्यांचा तुटवडा, उगवणशक्तीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 05:00 AM2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:00:34+5:30

जिल्ह्यात यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनचे नियोजन आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत कपाशीचे क्षेत्र घटले असून सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये ३२ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने पुरेशा बियाण्यांची गरज होती. मात्र, गेल्यावर्षी दीर्घकाळ राहिलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या बियाण्यांची उपलब्धता कमी झाली.

Seed scarcity, lack of germination | बियाण्यांचा तुटवडा, उगवणशक्तीचा अभाव

बियाण्यांचा तुटवडा, उगवणशक्तीचा अभाव

Next
ठळक मुद्देसोयाबीन उत्पादकांची कोंडी : पावसाच्या दडीने दुबार पेरणीचे संकट, कृषी विभागाच्या उंटावरून शेळ्या

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कापूस विक्रीकरिता आलेल्या अडचणी आणि कवडीमोल भाव मिळाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीत वाढ केली आहे. अशात सोयाबीनच्या बियाण्यांचा असलेला तुटवडा आणि बियाण्यांतील उगवण शक्तीचा अभाव, यामुळे सोयाबीन उत्पादकांची हंगामाच्या सुरुवातीलाच आर्थिक कोंडी झाली आहे. वरुणराजाही कोपल्याने आता दुबार पेरणीची सावट कायम आहे.
जिल्ह्यात यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनचे नियोजन आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत कपाशीचे क्षेत्र घटले असून सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये ३२ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने पुरेशा बियाण्यांची गरज होती. मात्र, गेल्यावर्षी दीर्घकाळ राहिलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या बियाण्यांची उपलब्धता कमी झाली. यावर्षीच्या हंगामाकरिता जिल्ह्यात ७२ हजार ९७५ क्विंटल बियाण्यांची मागणी असताना सध्यास्थितीत जिल्ह्याला ६७ हजार ५०० क्विंटलच बियाणे प्राप्त झाले आहे. यामध्ये विविध कंपनींचे प्रमाणित आणि अप्रमाणित बियाणे बाजारात आले आहे. काही कृषीकेंद्र संचालकांनी अप्रमाणित बियाणेच शेतकऱ्यांच्या माथी मारले आहे.
सोयाबीन अप्रमाणित बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी होत असल्याने या बियाण्यांमध्ये उगवण शक्तीचा अभाव असल्याचे बोलले जात आहे. सोबतच पावसानेही दडी मारल्याने सोयाबीन उत्पादक हंगामाच्या सुरुवातीलाच मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांची सोयाबीनच्या बियाण्यांमध्ये मोठी फसगत झाली असतानाही, कृषी विभागाकडून केवळ उंटावरुन शेळ्या हाकत असल्याची ओरड शेतकºयांकडून होत आहे.

ईगल एक्सलंट-प्लसच्या तक्रारी अधिक
काही कृषी केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांना इगल एक्सलंट-प्लस या अप्रमाणित (सिंगल लेबल) बियाणे घेण्याचा आग्रह करण्यात आला. शेतकºयांनी जवळपास अडीच हजार रुपये मोजून या बियाण्याची बॅग खरेदी केली आहे. पण, पेरल्यानंतर उगविलेच नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी केंद्र संचालकाला विचारणा केल्यास आम्ही जबाबदार नाही, तुमचे तुम्ही बघा, असे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. बोगस बियाण्यामुळे आलेली मोड आणि हंगामातील निघून गेलेले महत्त्वाचे दिवस यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
यासंदर्भात कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर कृषी विभागाकडून शेताची पाहणी करुन तो अहवाल शासनाला पाठविला जातो. तसेच शेतकऱ्याला ग्राहक मंचात दाद मागण्याचा सल्ला दिल्या जातो.पण, आता लागवडीच्या दिवसात शेतकºयाला या गोष्टी करणे अशक्य होत आहे. कारवाईबाबत असलेल्या अधांतरी धोरणामुळे शेतकरी पिचला जात असून कंपन्यांची मुजोरी वाढत आहे.

कृषी विभागाच्या लेखी १७ टक्केच पेरण्या
जिल्ह्यात मृगाच्या पावसाने हजेरी लावताच शेतकऱ्यांनी पेरणी लगबग सुरु केली. मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कपाशी व तुरीची लागवड केली आहे. जिल्ह्यात जवळपास ३० टक्केवर शेतकºयांनी लागवड केली असताना कृषी विभागाच्या लेखी १७ टक्केच लागवड झाल्याची नोंद आहे. विशेषत: पावसाने दडी मारल्यामुळे बहूतांश शेतकऱ्यांचे पीके उगविलीच नसून दुबार पेरणीची वेळ आली आहे.

कृषी केंद्रांची भेट अडीच हजारांची
हंगामाच्या दिवसात खतांचा व बियाण्यांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कृषी केंद्राची तपासणी केली जाते. कृषी केंद्रातील स्टॉक बुक व उपलब्ध साठा तपासल्या जातो. पण, या तपासणीसाठी गेल्यानंतर काही अधिकारी व कर्मचारी कृषी केंद्र संचालकांकडून दोन ते अडीच हजार रुपये वसूल करीत असल्याचीही बाब आता काही पुढे आली आहे. जिल्ह्यात ४०० वर कृषी केंद्र असल्याने हा प्रकार लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांचे हित जोपासणार की कृषी केंद्र संचालकाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. बियाण्यांची सर्व जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे बियाणे उगविले नसल्यास कृषी विभागाकडे लेखी तक्रार करावी. तक्रारीच्या आधारे तालुकास्तरीय कमिटी शेताची पाहणी केली जाते. त्यानंतर अहवाल तयार करुन तो शासनास पाठविला जातो. सोबतच शेतकऱ्याला ग्राहक मंचामध्ये दाद मागण्यास सांगितले जाते.
संजय बमनोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जि.प.,वर्धा.

Web Title: Seed scarcity, lack of germination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती