लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भूदानाचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्यामुळे वर्धा जिल्ह्याला दारुबंदी जिल्हा म्हणून ओळख मिळाली. पण, ४६ वर्षांनंतरही दारुबंदी करण्यात लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे दारुमुक्ती आंदोलन समितीने नुकताच झालेल्या बैठकीत आमदार व खासदार यांच्या घरी धडक देऊन आक्रोश सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे.दारुबंदी जिल्ह्यात दिवसेंदिवस दारुविक्रीचे व पिणाऱ्यांचे प्रमाण वाढतच असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारुची आयात होते. मद्यपींना व्यसनापासून मुक्त केल्याशिवाय कोणतेही अधिकारी दारुबंदी करु शकणार नाही. त्यामुळे दारुमुक्ती आंदोलन समितीने प्रत्येक तालुक्यात १० व्यसनमुक्ती केंद्र काढण्याची मागणी पुवीर्पासून केली आहे. त्यासंदर्भात आजी-माजी पालकमंत्री व शासनालाही निवेदन दिले आहे. पण, लोकप्रतिनिधींनीच याचा गांभीयार्ने विचार केला नसल्याने मागणी मागे पडली आहे. आता जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी व्यसनमुक्ती केंद्रासाठी प्रयत्न करावे, याकरिता त्यांच्या निवासस्थानी विधवा, दारुग्रस्त महिलानी आक्रोश सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यसनमुक्ती केंद्र सुरु न केल्यास लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघातील विधवा, दारुग्रस्त महिलांना खावटी द्यावी. मद्यपींना दारु पिण्याकरिता दारुभत्ता द्यावा तसेच जबाबदार अधिकाऱ्यांकडून भरपाईची करण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला दारुमुक्ती आंदोलन समितीचे प्रमुख भाई रजनिकांत, संगीता बढे, गीता कुमरे, पुष्पा झाडे, बेबी मडावी आदींची उपस्थिती होती.
दारुबंदीकरिता वर्ध्यात करणार आक्रोश सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 14:10 IST
वर्ध्यात दारुमुक्ती आंदोलन समितीने नुकताच झालेल्या बैठकीत आमदार व खासदार यांच्या घरी धडक देऊन आक्रोश सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे.
दारुबंदीकरिता वर्ध्यात करणार आक्रोश सत्याग्रह
ठळक मुद्देदारुमुक्ती आंदोलन समितीचा निर्णयआमदार, खासदारांच्या घरी धडकणार