तळेगाव (श्या़पं़) : अमरावती-नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सिमेतून जाणाऱ्या मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर छत्तीसगड, झारखंड आणि विदर्भातील चंद्रपूर आदी ठिकाणांहून लोखंड, सिमेंट, कोळसा सुरत, अहमदाबाद, मुंबईकडे जातो. वाटेत महामार्गावरील ढाबे आणि किरकोळ दुकानदारांना हा माल बाजारभावापेक्षा कमी दरात ट्रकचालक अवैधरित्या विकतात. यात लाखो रुपयांची दैनंदिन उलाढाल होत आहे. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़मुंबई-कोलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर प्रामुख्याने नागपूर-वर्धा-अमरावती जिल्ह्यांची सिमा आहे. अनेक वर्षांपासून महामार्गावरील ढाबे, हॉटेल, दुकानदार, टायर पंक्चर दुकानदार व किरकोळ विक्रेते ट्रक-चालकांकडून लोखंड, सिमेंट, कोळसा, कांदा, डांबर आदी वस्तू अत्यंत कमी दरात खरेदी करतात़ महामार्गावर प्रामुख्याने जिल्ह्यातील तळेगाव (श्या.पं.), कारंजा (घा.), अमरावती जिल्ह्यातील तिवसा, नागपूर जिल्ह्यातील कोढांळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय राजरोसपणे चालत आहे़ बाजार भावापेक्षा कमी दराने विविध वस्तू मिळत असल्याने ग्राहक त्या पावती न घेता खरेदी करतात़ यातच वजनमापे प्रमाणित राहत नाही. ‘चोरीचा मामला अन् हळूहळू बोंबला’, असा प्रकार सुरू आहे. ट्रकमधून विविध वस्तू उतरवून एखाद्या शेतात आडोशाला नेऊन टाकतात. ढाबा चालक ढाब्याच्या मागे ट्रक नेऊन माल खाली करतात. विशेषत: रात्रीच्या वेळी ट्रकमधून माल उतरविला जातो. रोख पैसे ट्रक चालकाच्या हातावर ठेवले जातात. यातून पोलिसांनाही हप्ते दिले जात असल्याची चर्चा आहे. यामुळे अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे समजते; पण ग्राहकांनी विकत घेतलेल्या मालाची कोणतीही ‘गॅरंटी’ नसते़ यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. महामार्ग तसेच तळेगाव पोलिसांनी असे प्रकार रोखण्यासाठी कारवाई करणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)
मुंबई-कोलकाता हायवेवर लोखंड, सिमेंटची विक्री
By admin | Updated: December 1, 2014 23:00 IST