सेलू : सेलूत ‘लोकमत’सह विविध दैनिकाच्या वर्तमानपत्राच्या पार्सल अज्ञात इसमांनी पहाटेच्यावेळी चोरून नेल्याने मंगळवारी अनेक वाचकांच्या घरी वृत्तपत्र पोहचले नाही. गावात येणारी सगळीच वर्तमानपत्रे चोरून नेण्याच्या या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सेलू पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नित्यनेमाने येणारे वर्तमान पत्राच्या पार्सलचे गठ्ठे हे येथील मेडिकल चौकात टाकल्या जाते. मंगळवारी (ता. २४) पहाटे ३ वाजताच्या सुमारास विविध वृत्तपत्राच्या पार्सल गाडीतून आलेले हे वृत्तपत्रांचे गठ्ठे येथे मेडीकल चौकात टाकण्यात आले. रात्रपाळीत कामावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ते गठ्ठे बघितल्याची नोंद पोलिसात असलेल्या तक्रारीत आहे. त्यानंतर अर्ध्या ते एक तासाच्या कालावधीत हे पेपरचे गठ्ठे येथून गायब झाले. यात सगळ्याच वर्तमानपत्राचे गठ्ठे होते. ही बाब पहाटे ४ वाजताच्या सुमारास पार्सल घेण्यासाठी आलेले मनोहर देशमुख या एजंटच्या लक्षात येताच इकडे तिकडे विचारणा केली. तेव्हा कुठेही गठ्ठे नसल्याचे दिसून आले. शेवटी याबाबत सेलू पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. एकाच वेळी एवढ्याही वृत्तपत्रांचे गठ्ठे लांबविल्याची ही पहिलीच घटना असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जवळपास सगळ्या प्रमुख दैनिकांचे १ हजार २०० अंक येथून चोरीला गेले आहेत. केवळ सेलूच नव्हे तर कान्हापूर तसेच पवनार येथूनही वर्तमानपत्राचे गठ्ठे चोरीस गेल्याची माहिती आहे. या घटनेचा सर्वस्तरातून येथे निषेध होत आहे. एखाद्या बातमीच्या अनुषंगाने जर हे वर्तमानपत्र गायब केले असेल तर ही बाब चिंता व्यक्त करणारी आहे, अशा प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे. याबाबत स्थानिक प्रतिनिधी तसेच वृत्तपत्र एजंट यांनी ठाणेदार संतोष बाकल यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांचा शोध घ्यावा अशी मागणी केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी यादृष्टीने तपास सुरू केला असून पोलीस गुन्हेगाराचा शोध घेत आहे. पार्सलच्या शोधात पोलीस आहेत. (तालुका प्रतिनिधी) अतिक्रमणाच्या वृत्तामुळे चोरी ?येथे अनेक दिवसांपासून असलेले अतिक्रमण सोमवारी महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाडले. हे अतिक्रमण येथील एका प्रतिष्ठिताचे असल्याचे समोर आले. या वृत्तात आपले नाव येऊन बदनामी होईल असे त्याला वाटल्याने त्यानेच वृत्तपत्रांचे गठ्ठे लंपास केल्याची चर्चा सेलू शहरासह आसपासच्या गावात आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास करून आरोपीचा शोध घेण्याची मागणी जोर धरत आहे. पार्सलचोरी प्रकरणी गुन्हा दाखलसेलू येथे येणाऱ्या सर्व वृत्तपत्रांच्या पार्सली चोरी गेल्याची तक्रार सेलू पो. स्टे. एजंट मनोहर देशमुख यांनी दिली. पोलिसांनी भादविच्या कलम ३७९ अन्वये अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एजंट मनोहर देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत भास्कर साटोणे, मंगेश भुते, राहुल धानकुटे यांच्या पार्सल चोरी गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. वृत्तपत्राच्या पार्सलची चोरी करण्याच्या प्रकरणाबाबत स्वत: जातीने लक्ष घालून तपास करीत आहे. घटना गंभीर आहे. पार्सल चोरून वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणाऱ्यांचा शोध लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. -संतोष बाकल, ठाणेदार, सेलू
सेलूत वर्तमानपत्रांच्या पार्सलची चोरी
By admin | Updated: February 25, 2015 01:54 IST