प्रभाकर शहाकार ल्ल पुलगाव (वर्धा)देशातील कारगील युध्दात शहीद झालेल्या शहरातील कृष्णा समरीत व सोहनसिंह पवार या दोन वीरांना शहरवासीयांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिल्यानंतर पुन्हा परत एकदा शहरात आक्रोश, शोक, संवेदना व्यक्त करीत सोमवारी मध्यरात्री बॉम्बस्फोटातील शहिदांना पुलवासीयांनी बाजारपेठा बंद ठेवून आदरांजली अर्पण केली. शहरात ठिकठिकाणी शहिदांना भावपूर्ण श्रध्दांजलीचे फलक झळकत होते.या आग व बॉम्बस्फोटाच्या घटनेत दोन लष्करी अधिकाऱ्यांसह शहरातील बाळासाहेब पाखरे, लिलाधर चोपडे, प्रमोद ऊर्फ बादल महादेव मेश्राम, अमित महादेव दांडेकर, अमोल येसनकर या पाच जणांना वीरमरण आले. मृतकांच्या परिवाराशी झालेल्या चर्चेनुसार शहीद झालेल्या वीरांचे मृतदेह ओळखण्यात अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. प्रस्तुत प्रतिनिधीने सर्वच शहिदांच्या निवासस्थानाला भेट दिली असता अजूनही १० ते १२ कर्मचारी बेपत्ता असल्याची चर्चा यावेळी ऐकायला मिळाली. मंगळवारी रात्री दोन मृतदेह आढळले. घटनास्थळी असलेला अंधार व बॉम्बस्फोटाच्या आवाजाने झालेल्या पळापळीत अमित दांडेकर व अमोल येसनकर या दोघांचा घटनास्थळाजवळील पाण्याच्या टाकीत पडल्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. त्यांना आधीच मृत घोषित करण्यात आले होते. मृतांमध्ये हिमाचल प्रदेशातील रविंद्र कुमार व राजेंद्रकुमार तसेच आर्वी पुनर्वसन गावातील शेखर बालसकर या तिघांचा अद्याप शोध लागला नसल्याचे समजते. घटनास्थळ परिसरातील दारूगोळा भांडाराचे शेड कोसळले. त्या खाली काही मृतदेह असण्याची शक्यता कर्मचारी व्यक्त करीत आहेत. भांडारच्या प्रवेशद्वारावर पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, नातलगांसह शहरवासीयांनी एकच गर्दी होती.
पुलगावात व्यापार बंद ठेवून शहिदांना आदरांजली
By admin | Updated: June 2, 2016 00:42 IST