सेलू (जि़वर्धा) : बसस्थानकाच्या मागील भागात वडगाव मार्गाला लागून करण्यात आलेले वादग्रस्त अतिक्रमण महसूल विभागाच्या पुढाकाराने सोमवारी (दि.२३) हटविण्यात आले. सुमारे १२ वर्षांपासून अतिक्रमण केलेल्या पांदण रस्त्यावर सुमारे दोन-तीन वर्षांत पक्के बांधकाम करण्यात आले होते. संजय व्यायाम प्रसारक मंडळाच्या नावावर चुडामन हांडे यांनी हे अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. पावसाळाच्या दिवसांत नागरिकांच्या घरात पाणी शिरत होते. या विरूद्ध ग्रा़पं़ पदाधिकाऱ्यांनी उपोषणही केले होते. तहसीलदारांनी चौकशीअंती सदर अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. यावर हांडे यांनी उच्च न्यायालयातून मनाई हुकूम मिळविला होता; पण जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या चौकशी समितीने सदर बांधकाम अतिक्रमणात असल्याचा निर्वाळा दिला़ यामुळे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. संपूर्ण अतिक्रमण जेसीबीद्वारे जमीनदोस्त करून संपूर्ण मलबा दिवसभर ट्रकद्वारे हटविण्यात आला़ एवढेच नव्हे तर तेथील जमिनीचे सपाटीकरण करून नालीही तयार करण्यात आली़ वडगाव मार्ग पावसाळ्यात तुटूंब भरून राहू नये म्हणून ही नाली थेट मागच्या मोठ्या नाल्याला जोडण्याचे काम सुरू आहे. हे अतिक्रमण हटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला़(तालुका प्रतिनिधी)
वादग्रस्त अतिक्रमण हटविल्याने नागरिकांना दिलासा
By admin | Updated: February 25, 2015 02:07 IST