सोमवारपासून निर्बंधात शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 05:00 AM2021-06-06T05:00:00+5:302021-06-06T05:00:08+5:30

कोविड विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता ‘ब्रेक द चेन’च्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न सोहळ्यांसह धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय कार्यक्रमांवर पुढील आदेशापर्यंत बंदी घातली होती. तर आता यात थोडी शिथिलता देण्यात आली आहे. नवीन आदेशान्वये सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना सोमवार ते शुक्रवार या काळात केवळ दुपारी ४ वाजेपर्यंत सभागृहाच्या क्षमतेच्या केवळ ५० टक्के उपस्थिती क्रमप्राप्त ठेवून परवानगी राहणार आहे.

Relaxation in restrictions since Monday | सोमवारपासून निर्बंधात शिथिलता

सोमवारपासून निर्बंधात शिथिलता

Next
ठळक मुद्दे५० व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह तर २० व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कारअत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरू राहणारमॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकसाठी खुले राहणार उद्याने, बगिचे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पॉझिटिव्हिटी दर आणि रिक्त ऑक्सिजन बेडच्या आधारांवर राज्यातील जिल्ह्यांची वर्गवारी ठरवत त्या त्या जिल्ह्यात कठोर निर्बंधात आणखी शिथिलता देण्याचे शासनाने निश्चित केले आहे. याच मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यातील शिथिलतेत आणखी वाढ केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नवीन आदेशान्वये आता ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडता येणार आहे. असे असले तरी लग्नसोहळ्यासाठी पोलीस विभागाकडून रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे. ही शिथिलता सोमवार ७ जून पासून लागू होणार आहे.
कोविड विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता ‘ब्रेक द चेन’च्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न सोहळ्यांसह धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय कार्यक्रमांवर पुढील आदेशापर्यंत बंदी घातली होती. तर आता यात थोडी शिथिलता देण्यात आली आहे. 
नवीन आदेशान्वये सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना सोमवार ते शुक्रवार या काळात केवळ दुपारी ४ वाजेपर्यंत सभागृहाच्या क्षमतेच्या केवळ ५० टक्के उपस्थिती क्रमप्राप्त ठेवून परवानगी राहणार आहे. तर ५० वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह समारंभ पार पाडता येणार आहे. कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेता हॉटेल, खानावळी यांना केवळ पार्सल सेवेचीच यापूर्वी परवानगी होती. तर नव्या आदेशान्वये रेस्टॉरंट, हॉटेल, खानावळी, शिवभोजन थाळी सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत ५० टक्के आसन क्षमतेने डाईन इन व शनिवारी व रविवारी केवळ पार्सल व होम डिलिव्हरी पद्धतीचा अवलंब करून सुरू ठेवता येणार आहे.
 

सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ७.५७ टक्के असून व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी ४.०४ टक्के आहे. शासनाने निश्चित केलेल्या पाच स्तरापैकी वर्धा जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात समावेश आहे.

जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहणार आहे. जिल्ह्यात सायंकाळी ५ नंतर संचारबंदी राहणार आहे. जमावबंदी आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईल.

नवीन आदेशान्वये विविध क्षेत्रात काही निर्बंध कायम ठेवून उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृहे ही पूर्णपणे बंद राहणार आहेत.
 

सर्व उद्योग, व्यवसाय व खासगी आस्थापना व त्यांच्या कर्मचाऱ्यांना निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहणार असून प्रत्येक पंधरा दिवसांनी त्यांना कोविड चाचणी करावी लागणार आहे.

बेशिस्तांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गटविकास अधिकारी तर शहरी भागात नगरपालिका तसेच नगरपंचायत प्रशासनाची राहणार आहे.

काय राहणार सुरू

अत्यावश्यक सेवेची प्रतिष्ठाने दररोज सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत सुरू ठेवता येईल.
अत्यावश्यक सेवा व वस्तू व्यतिरिक्तची प्रतिष्ठाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू ठेवता येणार आहे.
रेस्टॉरंट, हॉटेल, खानावळी, शिवभाेजन थाळीची प्रतिष्ठाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत ५० टक्के आसन क्षमतेनुसार डाईन इन तर शनिवार व रविवारी केवळ पार्सल व होम डिलिव्हरी सेवेसाठी सुरू ठेवता येणार आहेत.
खासगी आस्थापना सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार असून खासगी बँका, विमा, औषध कंपन्या, सूक्ष्म वित्त संस्था व गैर बँकिंग वित्त संस्था यांची कार्यालये नियमितपणे सुरू राहणार आहेत.
 

सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, उद्याने, बगीचे मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक तसेच सायकलिंगसाठी दररोज पहाटे ५ ते सकाळी ९ या वेळेत सुरू राहतील.
शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालये ५० टक्के उपस्थितीने सुरू राहणार असून कोरोना विषयक कामे करणाऱ्या आस्थापना, कृषी, बँक, मान्सूनपूर्व कामांशी संबंधित यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणांची कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत.
क्रीडा व मनोरंजनाची उपक्रमे बाहेर मोकळ्या जागेत पहाटे ५ ते सकाळी ९ तर सायंकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.
विवाह समारंभाला ५० तर अंत्यविधीला २० पेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती राहता येणार नाही.
५० टक्के उपस्थितीत आमसभा घेता येणार आहे.
जीम, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर दररोज दुपारी ४ वाजेपर्यंत एसीचा वापर न करता ५० टक्के क्षमतेने पूर्व परवानगीसह सुरू करता येणार आहेत.
सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने सुरू राहणार असून उभे राहून प्रवाशांना प्रवास करता येणार नाही.
आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक सुरू राहणार असून ज्या जिल्ह्यात किंवा राज्यात कोविडचा जास्त संसर्ग आहे अशा जिल्ह्यातून येणाऱ्यांना ई-पास आवश्यक राहणार आहे.
 

 

Web Title: Relaxation in restrictions since Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.