आठ पाणवठे नैसर्गिक : २१ ठिकाणी सोलर व्यवस्थारितेश वालदे सेलू (बोरधरण)बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांची उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्यात. यात प्राण्यांचा अधिवास असलेल्या परिसरातच पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण केली आहे. यासाठी वनविभागातर्फे नैसर्गिक, सोलर तसेच कृत्रिम, असे ५९ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या पाणवठ्यांमध्ये नियमितपणे पाणी पुरवठा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. बोर तथा न्यू बोर व्याघ्र प्रकल्प १३८.१२ चौरस किलोमीटर परिसरात व्यापलेला आहे. राज्यातील जैविक विविधता आणि विपूल जलसंपदा यामुळे वन्य प्राण्यांची संख्या मोठया प्रमाणात या व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. उन्हाळ्यात वन्य प्राण्यांच्या जंगल क्षेत्रातच पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बोर प्रकल्प आहे. सोबतच सोलर, कृत्रिम आणि नैसर्गिक, अशी ५९ पाणवठे या क्षेत्रात आहेत. यातील २१ पाणवठ्यांवर सोलर यंत्रणा बसविण्यात आल्याने दिवसभर सोलर पंपाद्वारे पाणवठ्यांत पाणी उपलब्ध होत आहे. आठ नैसर्गिक पाणवठ्यांत वर्षभर पाणी असते. इतर पाणवठ्यांवर टँकरद्वारे नियमित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल क्षेत्रातच वन्य प्राण्यांच्या अधिवासाजवळच पाणवठ्याद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने वन्यप्राण्यांची भटकंती थांबणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. बोर व्याघ्र प्रकल्पातील दुर्मीळ प्रजातीच्या वन्य प्राण्यांसोबत पशु व पक्ष्यांसाठी जंगल क्षेत्रातच पाणी उपलब्ध झाले आहे. यासाठी वनक्षेत्र अधिकारी आर.पी. गायनेर व जी.एफ. लुचे तसेच वनरक्षक, वनकर्मचारी प्रयत्नरत असतात. बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राणी भटकून ग्रामस्थांना त्रास होऊ नये म्हणून वन विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहे. यामुळेच प्राण्यांचा अधिवासही वाढतीवरच असल्याचे दिसते.ग्रामस्थांचा उन्हाळ्यात प्राण्यांमुळे होणारा त्रास थांबणारजंगल क्षेत्रात वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यास प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होते. जंगलातील प्राणी गावांमध्ये शिरून जनावरांसह प्रसंगी मानवावर हल्ले करतात. हे प्रकार टाळण्यासाठी जंगल क्षेत्रातच पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते. बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये वन विभागाकडून ५९ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. उन्हाळ्यात कधीही पाणी कमी होणार नाही, यासाठीही यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. परिणामी, प्राण्यांची भटकंती थांबून ग्रामस्थांचा त्रास दूर होणार असल्याचे सांगण्यात आले.
बोर व्याघ्र प्रकल्पात ५९ पाणवठे सज्ज
By admin | Updated: February 20, 2017 01:12 IST