अविरोध निवड : भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत घोषणावर्धा : भाजपाचे नवे जिल्हाध्यक्ष म्हणून देवळी येथील भाजपचे युवा नेते राजू बकाने यांची अविरोध निवड झाली. त्यांच्या रुपाने देवळी तालुक्याला पक्षाचे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व मिळाले आहे.वर्धा नागरी बँकेच्या माधव सभागृहात शुक्रवारी भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत मावळते जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून राजू बकाने यांचे नाव सुचित केले. खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर आणि आ. समीर कुणावार यांच्यासह सर्व माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले. यानंतर दुसरे कोणतेही नाव पुढे न आल्याने आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष सुभाष पारधी यांनी राजू बकाने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत घोषणा केली. व्यासपीठावर प्रामुख्याने भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, खा. रामदास तडस, मावळते जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समंीर कुणावार, माजी खासदार सुरेश वाघमारे व विजय मुडे, माजी आमदार दादाराव केचे ही मंडळी विराजमान होती.मावळते जिल्हाध्यक्ष डॉ. गोडे यांचे मनोगत झाले. याप्रसंगी नवे जिल्हाध्यक्ष बकाने यांच्याहस्ते डॉ. गोडे यांचा सत्कार करण्यात आला. बकाने यांनी सूत्रे हाती घेताच आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन पुढची वाटचाल करण्याचा शब्द उपस्थित पदाधिकारी व सदस्य, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांना दिला. यानंतर व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांची भाषणे झाली. प्रत्येकांनी भाजप सरकारच्या काळातील योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचा सूर काढला. बैठकीचे संचालन श्रीधर देशमुख, तर आभार सुनील गफाट यांनी मानले.राजू बकाने हे देवळीचे रहिवासी असून मागील दहा वर्षांपासून ते नगरसेवक आहेत. २००१ मध्ये भाजप-सेना युतीकडून नगराध्यक्ष पदाची सार्वत्रिक निवडणूक लढली होती. मात्र त्यांना यात अपयश आले. यानंतर २००६ मध्ये त्यांनी स्वतंत्रपणे नगरसेवकपदाची निवडणूक लढली आणि ती जिंकली. २०११ मध्ये त्यांनी रासदास तडस यांच्या नेतृत्वात भाजपात पुन:प्रवेश करीत नगरसेवक पदाची निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढली आणि ती जिंकली. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढण्याची मनीषा ते बाळगून होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी माजी खासदार सुरेश वाघमारे यांना तिकीट दिल्यामुळे त्यांचे आमदारकीचे स्वप्न भंगले. यामुळे देवळीत भाजपात बंडखोरी होईल, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यांना शांत बसविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले. भाजपची राज्य व केंद्रात सत्ता असल्यामुळे त्यांची एखाद्या महामंडळावर वर्णी लागेल, अशाही वावळ्या उठल्या होत्या. अशातच त्यांची आज जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्याने साऱ्या चर्चांना या निमित्ताने पूर्णविराम लागला आहे, असा सूरही यावेळी ऐकायला मिळाला.(जिल्हा प्रतिनिधी)भाजप नेत्यांचा अधिकारी वर्गांबाबत नाराजीचा सूरकेंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. मात्र अधिकाऱ्यांची मानसिकता अद्यापही काँग्रेस सरकारच्या काळातीलच आहे. त्यांना भाजपचे सरकार नको आहे, अशी त्यांची मानसिकता बघायला मिळते. भाजपच्या कार्यकर्त्यांची कामे हे अधिकारी करत नाही. सरकार बदलले तर अधिकारीही बदलले पाहिजे, अशा शब्दात बैठकीत भाजपच्या स्थानिक पुढाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर आसूड ओढले. यावर उपस्थितांनी टाळ्याही वाजवल्या.भाजपची सत्ता आल्यानंतर तीन वरिष्ठ अधिकारी बदलले हे विशेषकेंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर वर्धा जिल्ह्यात काँग्रेसच्या काळात असलेले जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आणि जि.प. मुख्याधिकारी उदय चौधरी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या हे विशेष.
राजू बकाने भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष
By admin | Updated: January 16, 2016 02:28 IST